या रावसाहेबांचे करायचे तरी काय?

0

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूर खरेदीवरून केलेल्या वक्तव्याचे तीव्र राजकीय पडसाद गुरुवारी उमटले. विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत संताप व्यक्त केला. अखेर दानवेंनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली. ‘रावसाहेब दानवे पदावर राहणं हे विरोधकांच्या फायद्याचे, त्यांच्यावर कारवाईची मागणी कशाला करता?’ अशी खोचक टिपणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका सुरू आहे.

वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दानवे यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे तसेच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी इतर पक्षांकडूनही केली जात आहे. अशावेळी शरद पवारांनी मात्र, विरोधकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी करू नये, असे म्हटले आहे. दानवेंच्या अशा प्रकारच्या वक्तव्यांचा फायदा विरोधी पक्षाला होईल, असा टोला शरद पवारांनी हाणला, तर यवतमाळ जिल्हा शिवसेनेचे प्रमुख संतोष ढवले यांच्याकडून, शेतकर्‍यांबद्दल असभ्य भाषा वापरणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जीभ कापून आणणार्‍याला 10 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

दानवेंकडून वारंवार वादग्रस्त वक्तव्ये
नोटा बदलून देतो हजार-पाचशेच्या नोटा असतील, तर द्या मी बदलून देतो, तुमच्याकडे नोटा असतील तर द्या माझ्याकडे, मी बदलून देतो आणि आपल्याजवळ कुठे नोटा बंद आहेत?, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी चिखलीतील सभेत केले.

दुष्काळ नव्हता, तरी मदत
गेल्या वर्षी अख्ख्या मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ नव्हता. मात्र, आम्ही मुद्दाम फाडून सांगायचो की, खूप दुष्काळ आहे. माणसे स्थलांतर करत आहेत, जनावरे मरत आहेत आणि हे खोटे चित्र उभे आम्ही करत होतो. याचा परिणाम असा झाला की, 68 वर्षांत पहिल्यांदा 4,200 कोटींची मदत मिळाली.

त्या लक्ष्मीचा स्वीकार करा
पैठणमधील प्रचारसभेत बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा.

आत्महत्या थांबतील हे लेखी द्या
कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबणार असतील, तर विरोधकांनी एकत्र यावे आणि त्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव द्यावा, असे अजब वक्तव्य शिर्डीतील सभेत केले होते.

‘रावसाहेब दानवे पदावर राहणं हे विरोधकांच्या फायद्याचे, त्यांच्यावर कारवाईची मागणी कशाला करता?’
शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

मी दिलगिरी व्यक्त करतो
मी शेतकर्‍यांना उद्देशून अपशब्द वापरला नाही, मने दुखावली असल्यास दिलगिरी व्यक्त करतो. शेतक-यांची बाजू घेत मी 35 वर्षे राजकारण केले. त्यांचे दु:ख मला कळते. मी स्वतः शेतकर्‍याच्या पोटी जन्म घेतलाय.
रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप.

दानवेंनी शेतकर्‍यांना नव्हे कार्यकर्त्यांविषयी बोलताना शिवराळ भाषा वापरली.
महादेव जानकर, मंत्री, महाराष्ट्र राज्य.

लातुरात फोटोला जोडे मारले
लातूर। भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल तूर खरेदी केली तरीही रडतात साले! असे उद्गार काल जालना येथे काढले होते. त्याचा लातूर शिवसेनेच्या वतीने गुरुवारी दुपारी शिवाजी चौकात दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारून खेटराचा हार खालून निषेध करण्यात आला.

उस्मानाबादमध्ये जोडे मारो आंदोलन
उस्मानाबाद । उस्मानाबादमध्ये शिवसेनाही आक्रमक झाली आहे. शिवसैनिकांनी दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारल्यानंतर दहन केले. उस्मानाबादमधील शिवाजी पुतळ्याजवळ गुरुवारी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी दानवेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. खबरदारी म्हणून पोलिसांनी आंदोलकांना काही वेळासाठी ताब्यात घेतले.

राजीनामा द्यावा
या वक्तव्याप्रकरणी रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्या, अशी मागणी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. या वक्तव्याबाबत संताप व्यक्त करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती.