‘या’ राज्यात सोमवारपासून उघडणार रेस्टॉरंट, कारसाठी ऑड-ईव्हन

0

थिरुवनंतपुरम: देशातील पहिला कोरोनाग्रस्त आढळून आल्यानंतरदेखील केरळ राज्याने कठोर उपाययोजना राबवून कोरोनावर बर्‍यापैकी नियंत्रण मिळवले आहे. गेल्या आठवडाभराच्या काळात केरळमध्ये फक्त एकाच करोना रुग्णाची वाढ झाली असून केरळात रुग्ण बरे होण्याची गतीही अधिक आहे. आता उद्या सोमवारपासून केरळ राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये जनजीवन पूर्ववत सुरू होणार असून या जिल्ह्यांना काही प्रमाणात सूट दिली जाणार आहे. या १४ जिल्ह्यांमधील रेस्टॉरन्ट्स उघडली जाणार असून खासगी वाहनांना ऑड-इव्हन नियमाप्रमाणे परवानगी दिली जाणार आहे.

२१ दिवसांच्या लॉकडाउननंतर केरळ राज्याने केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केले होता. या प्रस्तावात केरळने करोनाच्या तीव्रतेनुसार रेड, ऑरेन्ज ए, ऑरेन्ज बी आणि ग्रीन असे झोन तयार केले आहेत. त्यांपैकी ऑरेन्ज ए, ऑरेन्ज बी आणि ग्रीन अशा झोनमधील प्रतिबंध टप्प्याटप्प्याने हटवण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने केरळ सरकारचा हा प्रस्ताव स्वीकारला असून त्यानुसार केरळमधील रेड झोनमधील प्रतिबंध मात्र कायम राहणार आहेत. गेल्या आठवडाभराच्या काळात केरळमध्ये फक्त एक अंकी वाढ होताना दिसली. या बरोबरच केरळमध्ये करोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्याही झपाट्याने वाढली आहे. केरळमध्ये आतापर्यंत करोनाचे एकूण ३९६ रुग्ण आढळले असून यांपैकी २५५ लोक बरे झाले आहेत. केरळमध्ये करोनामुळे ३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Copy