‘या’ प्रकरणातून स्मिथने धडा घ्यावा -स्टीव वॉ

0

बंगळुरू । दुसर्‍या कसोटी सामन्यात पंचांनी स्मिथला बाद घोषित केले होेते. त्यानंतर डीआरएसचा निर्णय घेण्यासाठी ड्रेसिंग रूमकडे पाहून मदतीचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणावरून स्टिव्ह स्मिथवर चारही बाजूंनी टीका केली जात आहे.ऑस्ट्रेलियाच्याही माजी क्रिकेटपटूंकडूनी देखील स्मिथवर नाराजी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉने स्मिथने झालेल्या प्रकरणातून धडा घ्यायला हवा असे ठणकावले आहे. बंगळुरू मधील दुसर्‍या कसोटीत उमेश यादवच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथ पायचीत झाला. पंचांनीही त्याला बाद म्हणून घोषित केले.

यावेळी स्टीव्ह स्मिथने डीआरएस निर्णय घेण्याचा निर्णय घेतला. क्रिकेटमधील नियमांनुसार डीआरएसचा निर्णय हा सर्वस्वी मैदानावरील खेळाडूने घ्यायचा असतो. मात्र, स्टीव्ह स्मिथने थेट ऑस्ट्रेलियन संघाच्या ड्रेसिंग रूमकडे बघत डीआरएस निर्णय घेऊ किंवा नये, यासाठी विचारणा केली. त्यामुळे विराट कोहली चांगलाच भडकला होता. पंचांनी वेळीच हस्तक्षेप करून प्रकरण सोडवले. पंचांनीही स्टीव्ह स्मिथला ही कृती योग्य नसल्याचे सांगितले. स्टीव वॉ यांनी खासगी कार्यक्रमात स्मिथ प्रकरणावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, अप्रतिम सामना होता. पण आपण केवळ एकाच गोष्टीकडे लक्ष केंद्रीत करत आहोत हे दुर्देव आहे. पंचांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने प्रकरण तेथेच थांबले हे महत्त्वाचे होते. स्मिथने केलेला प्रकार नक्कीच चुकीचा आहे. यातून त्याने धडा घ्यायला हवा. याशिवाय वॉ यांनी याप्रकरणात आयसीसीने लक्ष घालावे अशी इच्छा देखील व्यक्त केली. डीआरएस निर्णय घेतानाच्या नियमांमध्ये आयसीसीने लक्ष घालून त्याचे अंतिम स्वरूप निश्चित करावे, असे वॉ म्हणाले. झाले गेले विसरून आता पुढील सामन्याचा विचार करायला हवा, झाला तो सामना अप्रतिम होता, असेही ते पुढे म्हणाले.