Private Advt

‘या’ कामासाठी मनपा कर्मचारी येणार तुमच्या घरी

जळगव- मार्च एंडिंग असल्यामुळे महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुलीवर अधिक भर दिला आहे. पीओएसव्दारे (पेमेंट ऑनलाईन सिस्टीम) व्दारे कर भरण्याची सुविधा प्रशासनाने उपलब्ध करुन दिली असून, त्याव्दारे महापालिकेचे कर्मचारी मशिन घेवून घरोघरी वसुलीसाठी जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान, प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयामध्ये प्रत्येकी पाच स्वॅप मशिन्स् देण्यात आल्या आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. त्याचा परिणाम मालमत्ता कराच्या वसुलीवरदेखील झाल्याचे दिसून येत आहे. मागील आणि चालू वर्षांची जवळपास ८५ कोटींची थकबाकी असून, आतापर्यंत थकीत आणि चालू वर्षाची ४६ कोटींची वसुली झाली आहे. मार्च एंडिंगपर्यंत ३९ कोटींची थकबाकी वसुल करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे. त्यामुळे आता प्रशासनाने मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासाठी अभय योजना देखील लागू केली आहे.

घरी जावून वसुल करणार कराची रक्कम
महानगरपालिकेने मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी ऑनलाईनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र, ज्या मिळकत धारकांना महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयांमध्ये कर भरण्यासाठी जाणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी आता प्रशासनाने सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयांसाठी प्रत्येकी पाच याप्रमाणे २० स्वॅप मशिन्स् उपलब्ध करुन दिल्या आहेत. ही मशिन घेवून कर्मचारी थकबाकीदारांकडे जावून कर आकारणी करतील. त्यानुसार प्रभाग समिती क्र. १ मध्ये ही प्रक्रिया सुरु करण्यात आली असून उर्वरित तीनही प्रभाग समिती कार्यालयांमध्ये ही प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली.