Private Advt

यावल शहरात 25 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

यावल : शहरातील तिरुपती नगरातील 25 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. शाहिस्ताबी शेख जावेद असे मयत विवाहितेचे नाव आहे. दीर्घ आजाराला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आजाराला कंटाळून आत्महत्येचा अंदाज
शहरातील तिरुपती नगरातील रहिवासी शेख जावेद हे प्लंबिंगचे काम करून उदरनिर्वाह करतात. रविवारी ते आपल्या मुलीला घेऊन सावदा येथे गेले होते तर त्यांचे आई-वडीलांसोबत त्यांचा सहा वर्षीय मुलगा भुसावळ येथे गेला होता. घरी त्यांची पत्नी शाहिस्ताबी शेख जावेद या एकट्याच होत्या. शेख जावेद हे दुपारी साडेतीन वाजेला घरी परतले असता दरवाजा बंद असल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता शहिस्ताबी यांनी गळफास घेतल्याचे उघड झाले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. मृतदेह ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. या प्रकरणी शेख जावेद यांच्या खबरीवरून यावल पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अजमल खान पठाण, सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे. मयत शाहिस्ताबी या क्षयरोगाने त्रस्त होती व आजाराला कंटाळून तिने आत्महत्या केली असावी ? असा अंदाज वर्तवण्यात आला. मयत विवाहितेच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.