Private Advt

यावल पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याने नशिराबादमधूनही चोरल्या सात दुचाकी

सातपुड्याच्या जंगलातून पोलिसांनी 20 दुचाकी केल्या होत्या जप्त : मूळ मालकांना दुचाकी परत मिळणार

यावल : यावल पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणी आरोपीस अटक केल्यानंतर त्योन सातपुड्याच्या जंगलात लपवून ठेवलेल्या तब्बल 20 दुचाकी काढून दिल्या होत्या. त्यातील सात दुचाकी या नशिराबाद, ता.जळगाव येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने शुक्रवारी नशिराबाद पोलिसांनी या दुचाकी ताब्यात घेतल्या असून मूळ मालकांचा शोध घेवून त्यांना त्या परत केल्या जाणार आहेत.

गोपनीय माहितीवरून आरोपीला केली अटक
संदीप दगडू महाजन (दहिगाव) यांची दुचाकी 23 जून रोजी चोरी झाल्या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल होता. तपासादरम्यान वाघझिरा, ता. यावल येथील अर्जुन नांदला पावरा (20) यास अटक केल्यानंतर आरोपीने जिल्हाभरातून चोरी केलेल्या तब्बल 20 दुचाकी सातपुड्याच्या अभयारण्यात लपवल्याची कबुली दिली होती. यावलचे निरीक्षक सुधीर पाटील यांनी सर्व 20 दुचाकी जप्त केल्या होत्या. जप्त दुचाकींपैकी सात दुचाकी नशिराबाद येथील असल्याचे समोर आल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संजय जाधव, गजानन देशमुख, किरण बाविस्कर यांनी दुचाकींची पडताळणी करीत या दुचाकी ताब्यात घेतल्या. लवकरच चोरीस गेलेल्या या दुचाकी आता मूळ मालकांना परत केल्या जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.