Private Advt

यावल पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 46 विषयांना मंजुरी

दोन विषयांवर गटनेता अतुल पाटील यांचा आक्षेप : पालिकेच्या अखेरच्या सभेकडे शहराचे लागले होते लक्ष

यावल : यावल नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पालिकेच्या सभागृहात गुरुवारी प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या पटलावर 48 विषय असलेतरी दोन विषय नामंजूर करण्यात आले व 46 विषयांना मंजुरी देण्यात आली.

या विषयांना नामंजूरी
नगरपरीषदेच्या वतीने दुर्बल घटकांसाठी असलेल्या तरतुदीतून गरजू विद्यार्थी व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याबाबतच्या विषयासह स्वच्छ भारत अभियानांतर्गत यावल नगरपालिकेचा देशांमध्ये चौथा क्रमांक आल्याने यावल शहरात डिजिटल बॅनर लावणे या विषयाला माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी आक्षेप घेतल्याने हे विषय नामंजूर करण्यात आले. अतुल पाटील म्हणाले की, पालिकेने काढलेल्या निविदांना केवळ तीन दिवसाचा अवधी देण्यात आला तर निविदांना किमान सात दिवसांचा अवधी असावाख, अशी तरतूद अस्तांना दोन्ही विषय आपत्कालीन अथवा तातडीचे नव्हते त्यामुळे दोन्ही निविदा बेकायदेशीर असल्याचे सभागृहात सांगितले. प्रशासनाच्या वतीने या विषयावर दिलगिरी व्यक्त करण्यात आली तर सर्व सभासदांनी दोन्ही विषय एकमताने नामंजूर केले. चर्चेत नगरसेवक अतुल पाटील, प्रा.मुकेश येवले, शे.असलम शे.नबी यांनी चर्चेत सहभाग घेतला. सभागृहाची ही अखेरची सभा असल्यामुळे शहरवासीयांचे लक्ष या सभेकडे लागले होते.

अतुल पाटील म्हणाले : अजेंड्यात अनेक चुका
यावल नगरपालिकेचा मिटिंग अजेंडा हा पूर्णपणे चुकीचा असून यात अनेक चुका असल्याचे गटनेते नगरसेवक अतुल पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. पहिला विषय हा मागील इतिवृत्तांत वाचून मग दुसरा विषय घेतला जातो तसेच शेवटचा विषय हा आयत्या वेळेस सभागृहासमोर येणार्‍या विषयांवर चर्चा असा असतो परंतु प्रशासकीय अधिकार्‍यांना मिटींग अजेंडा काढताना या गोष्टींचा विसर पडला, असेदेखील अतुल पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. नगरपालिकेला विश्वासात न घेता गरजू विद्यार्थ्यांना कपडे वाटप कसे केले गेले? कोणत्या ठिकाणी कपडे वाटप झाले, गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप हा उपक्रम चांगला असलातरी लोकप्रतिनिधी या कार्यक्रमापासून दूर का ठेवण्यात आले, यामागे प्रशासनाचा हेतू काय? असा प्रश्न अतुल पाटील यांनी उपस्थित केला.