यावल पालिका निवडणुकीत प्रहार पक्ष सर्व जागा स्वबळावर लढणार

उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांची पत्रकार परीषदेत माहिती

यावल : यावल पालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष सर्व जागा लढवणार असल्याची माहिती भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी यांनी शहरातील खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परीषदेत दिली. चौधरी म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व शहरांचा विकास झालेला असताना यावल शहराचा विकास झाला नाही, अर्थात त्यामागे स्वार्थी राजकारण असल्याचे त्यांनी सांगितले. यावल पालिकेच्या आगामी निवडणुकीत आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे संपूर्ण 21 उमेदवार रींगणात ताकदिनिशी उतरवले जाणार असल्याचे ते म्हणाले.

यावल शहराची विकासाच्या बाबतीत पिछेहाट
अनिल चौधरी म्हणाले की, यावल शहर वगळता जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रांचा विकास झाला यावल मात्र विकासाच्या बाबतीत मागे राहिले. या मागे स्वार्थी राजकारण हेच मुख्य कारण असल्याचे ते म्हणाले. बहुमताने नगराध्यक्ष बनवायचा व सोबतच्या नगरसेवकांनी सोईस्कररीत्या कामे करून पैसा कमवायचा व स्वतःच्या संपत्तीत वाढ करायची ? असा आरोपही त्यांनी केला. जनशक्ती पक्षाच्या वतीने पदाधिकार्‍यांना अधिकार दिले जाणार असल्याचे सांगून नवनियुक्त नवनिर्वाचित नगरसेवकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.

भुसावळच्या आखाडाही गाजवणार
चौधरी म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावसह अमळनेर, भुसावळए फैजपूर, रावेर, यावल येथील नगरपालिका निवडणूक ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने लढविली जाणार आहे. विकासाचे व्हिजन समोर ठेवून आम्ही निवडणुकीच्या आखाड्यात पूर्ण ताकदिनिशी लढणार असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परीषदप्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख अलीम शेख, उपनगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी, शहराध्यक्ष तुकाराम बारी, मोहम्मद हकीम, गोकुळ कोळी, सुभाष सोनवणे, उमर कच्छी, सफील शेख, शे.शकील, हाजी मोहम्मद हकीम, नितिन कोळी, तन्वीर मण्यार, रफिक टेलर शेख मजर, शे.निजाम, युनूस खन्ना, सागर चौधरी आदींची उपस्थिती होती.

Copy