Private Advt

यावल दरोड्यात वापरलेली दुचाकी तापी खोर्‍यातून जप्त

बंदुकीच्या धाकावर सराफा दुकानातून झाली होती साडेअकरा लाखांची लूट : संशयीत अडकणार जाळ्यात

यावल : शहरात शस्त्रधारी चार तरुणांनी बंदुकीच्या धाकावर सराफा दुकानात भरदिवसा धाडसी दरोडा टाकल्याची घटना बुधवार, 7 रोजी घडली. दरोडेखोरांनी सराफाला बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवत तब्बल 216 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 55 हजाराची रोकड मिळून 11 लाख 26 हजार 675 रुपयांचा ऐवज घेवून पल्सर दुचाकीवरून पोबारा केला होता. पाच दिवसांपासून जळगाव गुन्हे शाखेसह यावल पोलिसांकडून दरोड्याचा कसून तपास सुरू असतानाच पोलिसांनी सोमवारी गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी तापी नदीच्या खोर्‍यातून जप्त केली आहे. पोलिसांना तपासाच्या दृष्टीने हा महत्वाचा क्लू मानला जात असून दुचाकीच्या आधारे दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न आता केला जात आहे.

दरोडेखोरांचा पोलिसांकडून कसून शोध
यावल शहरातील सराफा गल्लीतील बाजीराव काशीदास कवडीवाले यांच्या सराफा दुकानात दुकान मालक जगदीश कवडीवाले हे दुकानात एकटेच असताना बंदुकधारी चार तरुणांनी दुकानात शिरत कवडीवाले यांच्या डोक्याला पिस्तूल लावून बुधवार, 7 जुलै रोजी भरदिवसा लूट केली होती. लुटीनंतर चौघे दरोडेखोर काळ्या रंगाच्या पल्सरने पसार झाले होते.

तापी खोर्‍यातून दुचाकी जप्त
पाच दिवसांपासून पोलिसांकडून दरोड्याची उकल करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच सोमवारी रावेर येथील विशेष गुन्हा शाखेचे हेड कॉस्टेबल महेंद्र सुरवाडे व कुणाल सोनवणे यांना अंजाळे शिवारातील तापी नदीच्या खोर्‍यात दुचाकी पडलेली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, हेड कॉन्स्टेबल संजय तायडे, असलम शेख, सुशील घुगे, यावल व रावेर पोलिसांच्या संयुक्त पथकाने जाऊन खोर्‍यातून मोटरसायकल काढून यावल येथील पोलिस ठाण्यात आणली. या दुचाकीवरून दरोडेखोर पसार झाले व पोलिसांचा तपास हा योग्य दिशेने सुरू असून लवकरच या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकतील, असा विश्‍वास निरीक्षक पाटील यांनी व्यक्त केला.