यावल दरोडा प्रकरण : अटकेतील पाचही आरोपींना 26 पर्यंत कोठडी

यावल : शहरातील बाजीराव काशिदास कवडीवाले ज्वेलर्स दुकानात 7 जुलै रोजी भर दिवसा दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी 216 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 55 हजाराची रोकड मिळून 11 लाख 26 हजार 675 रूपयांचा मुद्देमाल लांबवला होता. दरोड्याप्रकरणी एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून 22 रोजी त्यांची कोठडी संपल्यानंतर त्यांना यावल न्यायालयात हजर केले असता 26 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यात एक संशयीत अद्याप पसार असून त्याच्याकडे दरोड्यातील मुद्देमाल असल्याचे अटकेतील संशयीतांचे म्हणणे आहे.

आतापर्यंत पाच संशयीतांना अटक
यावलमधील दरोड्याप्रकरणी निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड (रा.भामरेकर नगर, कांदीवली, मुंबई), चंद्रकांत उर्फ विक्की चाले-लोणारी, यश विजय अडकमोल, मुकेश प्रकाश भालेराव, रुपेश उर्फ भनभन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर आरोपींना गुरुवार, 22 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली मात्र कोठडी संपल्यानंतर गुरूवारी न्या.एम.एस. बनचरे यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता पाचही संशयीतांना 26 जुलै पर्यंतची पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यावल पोलीस पसार असलेल्या सुनील अमरसिंग बारेला (रा.गोर्‍यापाडा, ता.चोपडा) याचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, हवालदार संजय तायडे, असलम खान, सुशील घुगे, राजेश वाढे, भूषण चव्हाण, गणेश ढाकणे, रोहिल गणेश आदी करीत आहेत.