Private Advt

यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपीला अटक

यावल : तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. नातेवाईकाच्या मदतीने पीडीतेला नाशिक येथे नेल्यानंतर नातेवाईक दाम्पत्याच्या घरी तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याने चौघांविरोधात या प्रकरणी यावल पोलिसात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाला अटक करण्यात आली आहे.

चौघांविरुद्ध पोस्को अन्वये गुन्हा
तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय तरुणीचे 27 एप्रिल 2022 रोजी पहाटे गावातील तरुण चंद्रकांत उर्फ भुषण आत्माराम सोनवणे (कोळी) याने महेंद्र कोळी (आसोदा, ता.जळगाव) यांच्या मदतीने अपहरण केले व त्या अल्पवयीन मुलीस नाशिक येथील नातेवाईक दीपाली जितेंद्र कोळी व जितेंद्र कोळी यांच्या घरी नेत बालिकेवर अत्याचार केला. चार दिवस अल्पवयीन पीडिता नाशिक येथे होती व रविवारी ती घरी परतली व तिने घडलेली घटना कुटुंबास सांगितली. यापूर्वी या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा यावल पोलिसात दाखल होता. अल्पवयीन मुलगी घरी पतल्याचे समजताच पोलिसांनी अल्पवयीन व चंद्रकांत उर्फ भुषण सोनवणे (कोळी) यास ताब्यात घेतले. आरोपी भूषणसह महेंद्र कोळी, नाशिक येथील जितेंद्र व दीपाली कोळी या चौघांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भुषण सोनवणे (कोळी) यास अटक करण्यात आली असून इतर तिघांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले. पुढील तपास यावलचे प्रभारी अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.