यावल तहसीलमधील लाचखोर अव्वल कारकूनास दोन दिवसांची कोठडी

0

शेतीचा अर्धा हिस्सा नावावर करण्यासाठी मागितली होती 15 हजारांची लाच

यावल- यावल तहसील कार्यालयातील अव्वल कारकूनानेही शेतीचा अर्धा हिस्सा नावावर करण्याच्या प्रकरणात 15 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर जळगाव एसीबीच्या पथकाने शुक्रवारी त्यास अटक केली होती. शनिवारी संशयीत आरोपी विजय पुंडलिक पाटील (44, सुयोग कॉलनी, जळगाव) यास भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने गुन्हा
लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत स्त्रियांचे हक्क सुरक्षित राहण्यासाठी निघालेल्या योजनेत शेतीचा अर्धा हिस्सा पत्नीच्या नावावर सुरक्षित ठेवण्यासाठी यावल तालुक्यातील तक्रारदाराने तहसील कार्यालयात प्रकरण सादर केले होते. हे काम करून देण्याच्या मागणीसाठी आरोपी तथा अव्वल कारकून विजय पाटील याने 15 हजारांची लाच 6 ऑगस्ट 2018 रोजी मागितली होती. एसीबीच्या तपासात ही बाब स्पष्ट झाल्याने 5 ऑक्टोबर रोजी आरोपीविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली होती. आरोपीला शनिवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांनी बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Copy