Private Advt

यावलला श्री बालाजी महाराज रथोत्सवात भाविक तल्लीन

यावल : सुमारे 110 वर्षाची परंपरा असलेला येथील श्री बालाजी महाराज रथोत्सवास शनिवारी सांयकाळी श्री महर्षी व्यास मंदिर पायथ्यालगतच्या नदिपात्रातून सुरवात झाली. बालाजी महाराजांच्या जयघोषात नागरीकांनी रथ ओढण्यास सुरवात केली. कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर दोन वर्षांपासुन रद्द करण्यात आलेल्या रथोत्सवास यंदा परवानगी मिळाल्याने भाविक,भक्तांमध्ये उत्साह दिसुन आला तर सायंकाळी महाराणा प्रताप नगराजवळील नदिपात्रात रथयात्रेचे आगमन झाले. तर याचं वेळी खंडेराव महाराज यांचा यात्रोत्सवानिमित्त चोपडा रस्त्यावरून 12 गाड्या देखील ओढण्यात आल्या. संपूर्ण शहरातून रथ मार्गस्त झाल्यानंतर रविवार, 17 रोजी पहाटे या रथोत्सवाचा समारोप झाला.

भाविकांमध्ये प्रचंड उत्साह
दोन वर्षानंतर कोरोना संकट ओसल्याने शहर शनवारी सायंकाळ नंतर श्री बालाजी जयघोषाने दुमदुमले होते. येथील महर्षी व्यास मंदिराजवळ नदिपात्रात ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात श्री बालाजींच्या रथाची महापुजा करण्यात आली व रथयात्रेस प्रारंभ झाला. व्यास मंदिर ते महाराणा प्रताप नगरापर्यंत सुमारे एक कि. मी. नदिपात्रातून श्री बालाजी महाराजांच्या जयघोषात नागरीकांनी रथ ओढत आणला. महाराणा प्रताप नगराजवळील नदीपात्रात खंडोबा महाराज यांच्या यात्रेचे आयोजन केले होते तसेच खंडोबा महाराजांच्या 12 गाडया देखील चोपडा रोडवरून नदी पात्रापर्यंत ओढण्यात आल्यात. बारागाड्या ओढ्यायचा मान बडगुजर गल्लीतील भगत गजानन काशिनाथ बडगुजर यांना मिळाला होता. रथोत्सव, यात्रा आणि बारागाड्या पाहण्यासाठी मोठ्या संख्येत भाविक, भक्तांची शहरात गर्दी झाली होती. महाराणा प्रताप नगरातील 12 गाड्यांचा कार्यक्रम पार पडल्यावर रथयात्रेचे शहरात आगमन झाले.

रथाचे भाविकांकडून पूजन
रथाच्या पूजन व स्वागताकरीता घरा-घरातून भाविकांकडून स्वागत व पुजन केले जात होते. ही रथयात्रा संपूर्ण रात्रभर शहरातून मार्गक्रमण करीत रविवारी पहाटेच्या सुमारास भवानी माता मंदिराजवळ या रथोत्सवाची सांगता होणार आहे. रथमार्गावर महीलांनी आपआपल्या घरासमोर रांगोळया काढल्या असून रथपुजा केली जाते. येथील रथोत्सव म्हणजे शहरवासीयांसाठी आंनदाची पर्वणीच आहे. या रथोत्सवात कायदा व सुव्यवस्थे करीता यावल पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त राखण्यात आला.

शहरातून असा मार्गस्त झाला रथ
शहरात दाखल झालेला रथ हा चावडी, मेनरोड, बोरावलगेट, देशमुखवाडा, लक्ष्मीनारायण मंदिर मार्गे देविच्या मंदिराजवळ पहाटेच्या सुमारास रथोत्सवाची सांगता होते. शहरातील अरूंद व चढ-उताराचे रस्ते, रथाची भव्य उंची, सुमारे 12 टन वजन असलेल्या या रथास मोगरी लावणे, त्यास वळविणे ही कामे अत्यंत अवघड असून कसब पणास लावावे लागते. यासाठी पुर्वीपासूनची नेमलेली मंडळीच ही कामे करतात. रथासोबत असेलेले विशीष्ष्ठ पेहरावातील भालदार-चोपदार मंडळी शहरवासीयांचे लक्ष वेधत होती.