यावलमध्ये वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण करून परीसर स्वच्छ करा

0

शाळा-महाविद्यालय सुरू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर पदाधिकार्‍यांच्या सूचना

यावल : कोरोना पार्श्‍वभूमीवर 15 जून रोजी सुरू होणारे शैक्षणिक वर्ष यावर्षी लांबले आहे तर महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार 1 जुलै 2020 रोजी शाळा व विद्यालय सुरू करणे बाबत आदेश प्राप्त आहेत. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी नगरपरीषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील व नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्यासह सहकार्‍यांनी विद्यालयाला भेट देऊन मुख्याध्यापक, उपप्राचार्य व पर्यवेक्षक यांना 1 जुलै पूर्वी विद्यालयातील सर्व वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना केलय तसेच परीसर स्वच्छता करून फवारणी करण्याबाबत सूचना केल्य. विद्यालय सुरू झाल्यानंतर प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसेल, अशा प्रकारची व्यवस्था करण्याबाबत सूचना केली.

योग्य ती काळजी घ्यावी
नगरपालिकेतील आरोग्य विभागाची मदत घेण्याबाबत चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी तोंडाला मास्क बांधूनच शाळेत येईल याबाबत काळजी घेण्याच्या तसेच शाळेमध्ये हात स्वच्छ होण्यासाठी पाण्याची तसेच साबणाचीदेखील व्यवस्था करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व तयारी पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मुख्याध्यापक एस.आर.वाघ, उपप्राचार्य इंगळे, पर्यवेक्षक एम.के.पाटील तसेच पर्यवेक्षक एस.टी.दांडेकर यांनी दिली. यावेळी कार्यकर्ते गणेश महाजन, धीरज महाजन आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Copy