यावलमध्ये चारचाकीतून बकर्‍या लांबवणार्‍यास नागरीकांनी चोपले

दोन संशयीत पसार : चालकास यावल पोलिसांनी केली अटक

यावल : शहरातील विस्तारीत भागातून अनेक दिवसांपासून बकर्‍यांची चोरी होत असल्याने पशूपालक त्रस्त असताच सोमवारी या भागात स्विप्ट कार (क्रमांक एम.पी. 09 सी. एक्स. 9453) ही दुपारी फिरताना दिसल्याने नागरीक सोहेल खान, जफर खान, सैय्यद मुब्बशिल अली, इरफान कुरेशी, बासित खान, अहेमद रजा खान यांना संशय आल्यानंत त्यांनी वाहन थांबवून विचारणा केल्यानंतर संबंधितांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिल्यानंत नागरीकांना संशय आल्यानंतर त्यांनी संबंधिताना वाहनाच्या खाली उतरण्यास सांगितल्यानंतर जीन पैकी दोघांनी जमावाला पाहताच पळ काढला. चारचाकीची डिक्की उघडल्यानंतर त्यात चक्क चार बकर्‍या आढळल्याने संतप्त नागरीकांनी वाहन चालक इम्रान उर्फ बबलु रफीक खान (33, रा. इंदौर, मध्यप्रदेश) यास बेदम चोप देत वाहनाच्या काचा फोडल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार, सहा.फौजदार कैलास चव्हाण, हवालदार सुनील जमदाडे, असलम खान, भूषण चव्हाण हे दाखल झाले. त्यांनी चोरी केलेल्या बकर्‍या, वाहन व जखमी असलेल्या संशयीतास ताब्यात घेत जखमीला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, डॉ.प्रतीक तायडे, अधिपरीचारीका आरती कोल्हे, कादर तडवी आदींनी उपचार केले तर या प्रकरणी तीन संशयीतांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे