Private Advt

यावलमध्ये एकाच रात्री चार ठिकाणी चोरी ; 85 हजारांचा ऐवज लांबवला

यावल : शहरातील बाबा नगर भागात सोमवारी मध्यरात्रीनंतर दोन किराणा दुकानांसह दोन घरांमध्ये चोरी झाल्याने शहरात खळबळ उडाली. दोन घरांमधून सुमारे 25 हजारांचे मोबाईल तर दोन्ही दुकानांमधून सुमारे 60 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला. या प्रकरणी पोलिसांनी आसिफ शेख शमशोद्दीन या संशयीतास ताब्यात घेत त्याच्याकडून काही मुद्देमाल जप्त केला तर फरदीन पटेल हा संशयीत पसार झाला.

चोरीमुळे उडाली खळबळ
शहरातील विरारनगर भागातील रहिवासी रफिक पटेल यांचे तसेच गनी पटेल यांचेही किराणा दुकान आहे. सोमवारी रात्री दुकाने बंद करून ते दोघे घरी निघून गेल्यानंतर मंगळवारी सकाळी चोरी झाल्याचे निदर्शनास आले. गनी पटेल यांच्या दुकानातून आठ हजारांचा किराणा माल व सुमारे पाच हजारांची रोकड असा 13 हजारांचा मुद्देमाल लांबवण्यात आला तर शेख अस्लम शेख अयुब यांच्या घरातून पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेला तसेच रफीक शफी पटेल यांच्या किराणा दुकानातून 31 हजार रुपये रोख व अन्य मिळून 47 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. त्यांच्या दुकानांलगत रहिवासी सईद रशीद तडवी यांच्या घरातून 20 हजार रूपये किमतीचे दोन मोबाईल चोरीस गेले. चोरीच्या घटनांची माहिती मिळताच येथील पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक आशीत कांबळे, पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर दाखल घटनास्थळी येत पाहणी केली. तपास हवालदार बालक बार्‍हे करत आहे. एकाच रात्री चार ठिकाणी चोर्‍या झाल्याने भीती पसरली आहे.