Private Advt

यावलमधील कुपोषणाचा मुद्दा विधानसभेत मांडणार

यावल तालुक्यात पंचायत राज समितीची भेटीप्रसंगी ग्वाही : डागडूजी झालेल्या रस्त्यातून प्रवास करताना समितीचे वाहन फसले

यावल : यावल तालुक्यातील निर्माण झालेला कुपोषणाचा प्रश्न विधानसभेत मांडण्यात येईल तसेच तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील कुपोषण समस्या सोडवण्यासाठी निश्‍चित प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही पीआरसी समितीच्या पदाधिकार्‍यांनी यावलमध्ये माध्यमांशी बोलताना दिली.यावल तालुक्यात मंगळवारी महाराष्ट्र विधान मंडळाची पंचायत राज समितीने भेट दिली. जळगावहून निघालेल्या समितीने डांभूर्णी गावात भेट दिली मात्र डागडूजी केलेल्या रस्त्यांवर आमदारांचे वाहन फसले तर पुढे किनगावात पाहणी करीत समितीने पंचायत समितीमध्ये आढावा घेतला. दरम्यान, रावेरात गोठा योजना व पाणीपुरवठा अपहारावरून अधिकार्‍यांना समितीने फैलावर घेतले तसेच महापुरूषांच्या प्रतिमा अनादरप्रकरणी गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाईचे संकेत समितीने दिले.

या सदस्यांचा समितीत सहभाग
समिती अध्यक्ष म्हणून आमदार अनिल भाईदास पाटील, सदस्य आमदार देवराज कोळी, माधवराज जवळगावकर, विधी मंडळ अधिकारी शशीकांत साखरकर, बाल कल्याण उपमुख्यकार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत, प्रतिवेदक मैत्रेय कुळकर्णी आले होते. समितीने डांभूर्णी येथे भेट दिली. गावात समिती येत असल्याने रस्त्याची डागडूजी करण्यात आली होती तर पाऊस सुरू असल्याने या डागडूजी केलेल्या रस्त्यात समितीचे वाहनचं फसले. नागरीकांच्या मदतीने वाहन काढण्यात आले. समितीने गावात विविध ठिकाणी भेट देत कामांची पाहणी केली तसेच किनगाव येथे देखील समितीने भेट देवून विविध कामांची पाहणी केली तर दुपारी समिती यावल शहरात दाखल झाली. येथे पंचायत समितीच्या नूतन वास्तुत समितीच्या वतीने सन 2017-2018 या वर्षाचा कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

अधिकार्‍यांनी कामांची दिली माहिती
गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील, विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, महिला व बाल प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे, गट शिक्षण अधिकारी नईम शेख तसेच यावल पंचायत समितीतील बांधकाम, कृषी सह विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी समितीसमोर आढावा सादर केला. तसेच समितीचे तालुक्यात स्वागतकरीता पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, जिल्हा परिषद गटनेता प्रभाकर सोनवणे, जिल्हा परीषद सदस्य सविता भालेराव, आर.जी.पाटील, पंचायत समितीचे उपसभापती योगेश भंगाळे, काँग्रेसचे गटनेता शेखर पाटील, पुरूजीत चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, विलास चौधरी, उजैन्नसिंग राजपूत, गिरधर पाटील, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, जलील पटेल, शेख अय्युब, निवृत्ती धांडे, अशोक तायडे सह आदींची उपस्थिती होती.

शंभर टक्के लसीकरणाचे कौतुक
यावल तालुक्यात 100 टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेल्या राजोरा ग्रामपंचायतीचे समितीच्या वतीने कौतुक करण्यात आले व सरपंच पुष्पा गिरधर पाटील, उपसरपंच दिनेश पाटील, ग्रामसेवक पी.पी.चौधरी यांना सन्मानीत करण्यात आले. डांभूर्णी घरकुल गैर व्यवहार प्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीची सखौल चौकशी करून समिती कडे अहवाल द्यावा व चुंचाळे गावातील व्यायाम शाळेच्या कामाची माहिती द्यावी, अशा सूचना समितीने यावेळी केल्या.

समिती सदस्यांकडे विविध विषयांबाबत निवेदन
या प्रसंगी समितीकडे रीपाइंचे अशोक तायडे यांनी मनरेगा कामात बोगस मजूर, निवृत्ती धांडे यांनी ग्रामपंचायतीत गैर व्यवहार, नायगाव गावातील महिला मजुरांची रखडलेली मजुरी व आकाश रमेश तायडे यांनी गावात मनरेगामधील वृक्षरोपणातील गैरव्यवहार संदर्भात समितीकडे लेखी तक्रार करण्यात आली.