यावर्षी गणेशोत्सव नाही तर आरोगोत्सव: लालबाग गणेश मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

0

मुंबई: करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सार्वजनिक उत्सव साजरे होणार नाही. अनेक गणेशोत्सव मंडळांनी लहान आकाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवासंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा न करता आरोग्यत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. श्री गणेश मूर्तीची स्थापना नकरता यंदा लालबागचा राजाच्या दर्शनाला कोट्यवधी भाविकांना मुकावे लागणार आहे.

११ दिवस गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता या ११ दिवसांमध्ये रक्तदान शिबिरे तसेच प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर असतानाच राज्यासमोर असणारे करोनाचे संकट लक्षात घेता मंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनला येतात. करोनाच्या काळात ही गर्दी टाळण्यासाठी मंडळाने यंदा मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर आधीच बराच ताण आहे. त्यात गणेशोत्सवामुळे होणाऱ्या गर्दीतून करोनाचा संसर्ग होऊ नये या दृष्टीने खबरदारी म्हणून मंडळानेच पुढाकार घेत हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. करोनाच्या काळामध्ये राज्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी रक्तदान आणि प्लाझमा थेरपी उपक्रम मंडळामार्फत राबवण्यात येणार आहे.

दरवर्षी लालबागच्या राजाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा मात्र अगदी साध्यापद्धतीने आणि समाजभान राखत मंडळाने उत्सव साजरा न करण्याला प्राधान्य दिलं आहे.

Copy