यशस्वी जीवन जगण्यासाठी सक्षम होऊन आत्मविश्‍वास वृद्धींगत करावा

0

शिरपूर : भारतीय संस्कृतीनुसार नारीशक्तीला अनेक ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळत असल्याची बाब आनंददायी असून भारताला भारत माता म्हटले जात असल्याची गौरवशाली परंपरा आहे. यशस्वी जीवन जगण्यासाठी सर्व महिला तसेच विद्यार्थिनींनी आत्मविश्‍वास वृद्धींगत करावा. सर्वांनी विविध क्षेत्रात सक्षम होणे गरजेचे आहे. जीवनात कितीही मोठी संकटे आली तरी डगमगू नका. आत्महत्येपासून इतरांना परावृत्त करण्यासाठी सहकार्य करावे. गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाशिवाय सद्यस्थितीत पर्याय नाही. उच्च शिक्षण घेऊन कुटुंबाला पुढे नेण्यासाठी नेहमीच तत्पर रहावे. घेतलेले उच्च शिक्षण उपयोगात आणून नोकरी व व्यवसायात प्रगती साधावी. स्व-रक्षणासाठी सर्व विद्यार्थिनींनी स्वयंसिद्धा अभियानातील महत्वपूर्ण बाबींचे अवलोकन करावे. आर.सी.पटेल फार्मसी कॉलेजमार्फत होणारे दर्जेदार कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांनी केले.

स्वयंसिद्धा अभियान कार्यशाळेचे उद्घाटन
शिरपूर येथील आर.सी.पटेल इन्स्टिट्युट ऑफ फार्मास्युटीकल रिसर्च अ‍ॅण्ड सेंटरच्या वुमेन्स फोरम कडून दि.23 जानेवारी ते दि.29 जानेवारी पर्यंत आयोजित स्वयंसिद्धा अभियान कार्यशाळेचे उद्घाटन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. आर.सी.पटेल फार्मसी कॉलेज कॅम्पसमधील एस.एम.पटेल ऑडीटोरीअम हॉलमध्ये सोमवार दि.23 रोजी स्वयंसिद्धा अभियान सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयश्रीबेन पटेल होते. याप्रसंगी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस.जे.सुराणा, स्वयंसिद्धा विभागीय प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे, उपप्राचार्य डॉ.ए.ए.शिरखेडकर, उपप्राचार्य डॉ.पी.एच.पाटील, कार्यशाळेच्या समन्वयिका प्रा.डॉ.पी.व्ही.जोशी-आगरकर, स्वयंसिद्धा विभागीय नियंत्रक तथा पोलिस अश्‍विनी जंजाळे, स्वयंसिद्धा जिल्हा नियंत्रक प्राजक्ता सोनवणे, स्वयंसिद्धा जिल्हा प्रशिक्षक योगेश पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रा.रुचिरा गजभिये व विद्यार्थिनींनी ईशस्तवन सादर केले. कार्यक्रमास किरनबेन पटेल, कक्कूबेन पटेल, न.पा. बांधकाम सभापती संगिता देवरे, शिक्षण सभापती आशा बागुल, पाणी पुरवठा सभापती छाया ईशी, उज्वला अहिरे, मोनिका शेटे, लक्ष्मीबाई भिल, नगरसेविका रंजनाबाई सोनवणे, चंद्रकला माळी, नाजीराबी शेख यांच्यासह पदाधिकारी, अनेक महिला, प्राध्यापिका, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य डॉ.संजय सुराणा यांनी संस्थेच्या प्रगतीविषयी व फार्मसी कॉलेजविषयी सविस्तर माहिती देऊन कॉलेजच्या यशस्वी वाटचालीबद्दल विवेचन केले.

स्वतःच्या रक्षणासाठी स्वतःच पुढे या
राजेंद्र जंजाळे म्हणाले की, पूर्वी पासून महिला व मुली आत्महत्या करीत असल्याची बाब खूपच वेदनादायी व दुखःदायक आहे. परंतु, स्वयंसिद्धा अभियानातून आठवडाभर मुलींना संरक्षणाचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी स्वतःच पुढे यायचे आहे. महिला व मुलींनी खंबीर होऊन आत्मविश्‍वास वाढविण्याची गरज आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रा.डॉ.पी.व्ही.जोशी-आगरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन प्रा.सौ.स्नेहल भावसार व प्रा.सौ.हेमाक्षी चौधरी यांनी केले. आभार प्रा.डॉ.सौ.योगिता गोयल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.सी.पटेल वुमेन्स फोरमच्या सर्व महिला पदाधिकारी परीश्रम घेत आहेत.