यशवंतराव हे निःस्पृह व चारित्र्य संपन्न राजकारणी होते – ज्येष्ठ समिक्षक डॉ.किशोर सानप

0
अंबाजोगाईत 34 व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे शानदार उद्घाटन

अंबाजोगाई : यशवंतराव चव्हाण हे अतिशय संस्कारशील, निःस्पृह, प्रतिभावान व चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्व होते. त्यांनी आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण केली. यशवंतराव हे लोकांचे राजकारणी होते.आज कालच्या राजकारण्यात यशवंतराव एवढी उंची नाही. स्वतःच्या आयुष्याची ज्योत पेटवुन लोकांना प्रकाशमान करून त्यांचे आयुष्य उजळविण्याचे काम यशवंतरावांनी केले. त्यांचे नेतृत्व हे राष्ट्रव्यापी होते. देशासमोरील प्रश्नांचे चिंतन त्यांच्या विचारात आढळुन येते. त्यांच्या विचारांचा वारसा अंबाजोगाईत स्व. भगवानराव लोमटे बापु यांनी या स्मृती समारोहाच्या माध्यमातून सुरू ठेवला आहे. महाराष्ट्रात कुठेही सातत्याने असा समारोह होत नाही.तो अंबाजोगाईत होत असल्याबद्दल डॉ. किशोर सानप यांनी यावेळी समाधान व्यक्त केले व यशवंतराव चव्हाण यांच्या सर्वव्यापी व्यक्तीमत्वाचे विविध पैलु आपल्या उद्घाटकीय भाषणात मांडले. अंबाजोगाईत रविवार दि. 25 नोव्हेंबर रोजी 34 व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे शानदार उद्घाटन झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.अशोक चौसाळकर तर उद्घाटक म्हणून समिक्षक तथा लेखक प्रा.डॉ.किशोर सानप (नागपुर) हे होते. यावेळी व्यासपीठावर स्मृती समारोह समितीचे सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना डॉ.किशोर सानप यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या सर्वव्यापी व्यक्तीमत्वाचे विविध पैलु ठेवले. यशवंतराव हे दृष्ट्ये राजकिय नेते, कुशल प्रशासक त्या सोबतच चिंतनशील साहित्यीक होते.हे सांगुन त्यांच्या व्यक्तीमत्वातील पैलुंवर सानप यांनी प्रकाश टाकला.

यावेळी अध्यक्षीय समारोप करताना डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव यशवंतराव चव्हाणांवर होता.लोकांसाठी काम करणारे, गरीबांची जाणीव ठेवणारे व महाराष्ट्राला सर्वक्षेत्रात पुढे नेण्यासाठी ज्यांनी विचारांचा पाया रोवला. अशा यशवंतरावांच्या स्मृती महाराष्ट्राने कायम जपल्या पाहिजेत असे आवाहन करत त्यांनी स्मृती समारोह समितीच्या माध्यमातून हे काम होत असल्याबद्दल या प्रसंगी समाधान व्यक्त केले.

प्रांरभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समारोह समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी गेल्या 33 वर्षातील उपक्रमांचा आढावा घेत तीन दिवसीय समारोहाची विस्तृत माहिती यावेळी दिली. हा समारोह म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा जागर असल्याचे सांगुन या समारोहातून अंबाजोगाई शहरात उत्तम दर्जाचे रसिक, श्रोते,वाचक,तानसेन, गानसेन,चित्रकार आदी व्यक्तीमत्व घडत ही सर्व मान्यवर मंडळी समाजाच्या विविध क्षेत्रात आपले योगदान देत असल्याचे दगडू लोमटे म्हणाले.

पाहुण्यांचा परिचय समारोह समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनी करून दिला. सुरूवातीला मान्यवरांनी यशवंतराव चव्हाण व भगवानराव लोमटे (बापू) यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून दीपप्रज्वलन केले. मातृस्वर संगीत विद्यालयाचे संचालक विश्वजीत धाट व त्यांच्या संचाने स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार प्रा.मेघराज पवळे यांनी मानले. 34 व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची  मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह हा भगवानराव बप्पा शिंदे,राजेंद्र लोमटे, यशवंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, सचिव दगडू लोमटे, कोषाध्यक्ष सतिष लोमटे,सदस्य प्रा.भगवान शिंदे , त्र्यंबक पोखरकर, प्रा.सुधीर वैद्य, डॉ.प्रकाश प्रयाग, प्रा.शर्मिष्ठा लोमटे यांच्या पुढाकाराने साजरा होत आहे.

Copy