यशवंतराव चव्हाणांनी राजकारणाची संस्कृती बदलली – डॉ.आनंद पाटील

0

यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा शानदार समारोप

यशवंतराव चव्हाण कृषी,साहित्य,संगीत पुरस्काराने मान्यवर सन्मानित

अंबाजोगाई : सत्य बोलणारांवर बहिष्कार टाकणारे महाराष्ट्र हे राज्य पुरोगामी कसे काय असू शकते? असा सवाल करून यशवंतराव चव्हाण यांनी देशातील राजकारणाची संस्कृती बदलण्याचे काम केले. तर आजचे राजकारणी हे संस्कृतीचे राजकारण करत आहेत. आजच्या काळात असत्य बोलणे व लिहिणे ही सर्वोत्कृष्ठ कलाकृती मानली जाते. यशवंतराव चव्हाणांना विश्व साहित्याचे चांगले आकलन होते,त्यांचा अभ्यास होता, विचारांना दिशा देणारे यशवंतराव हे लोकशिक्षक होते मात्र बेरजेच्या राजकारणाने यशवंतरावांची दिल्लीच्या राजकारणात पिछेहाट झाली. यशवंतराव चव्हाणांचे साहित्य व मोठेपण अद्यापही महाराष्ट्राला कळाले नसल्याची खंत ज्येष्ठ साहित्यीक व इतिहास संशोधक डॉ.आनंद पाटील यांनी व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या समारोप समारंभात ते बोलत होते.34 व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा शानदार समारोप मंगळवार,दि.27 नोव्हेंबर रोजी झाला. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यीक व इतिहास संशोधक डॉ.आनंद पाटील हे होते. यावेळी डॉ.बी.बी.ठोंबरे,प्रा.मधु जामकर,श्रीमती राजकुंवर आठवले समारोह समितीचे सचिव दगडू लोमटे , उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी विश्वजीत धाट व त्यांच्या मातृस्वर संगीत विद्यालयाच्या संचाने स्वागतगीत सादर केले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या व भगवानराव लोमटे (बापू) यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे कोषाध्यक्ष सतिष लोमटे,सहसचिव प्रा.सुधीर वैद्य यांनी स्वागत केले.

या प्रसंगी बोलताना ज्येष्ठ साहित्यीक व इतिहास संशोधक डॉ.आनंद पाटील यांनी राजकारणाबाहेरच्या राजकारणावर नेमकेपणाने मार्मीक शब्दांत भाष्य केले. ते म्हणाले की,जाती-धर्माच्या पलीकडे जावून आपण आज नव्या जगात आहोत, तेंव्हा नव्या जगानुसार विचार केला पाहिजे. यशवंतरावांनी महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर हे राज्य कोणत्याही एका जाती-धर्माचे केले नाही तर ते सर्व समाजाचे केले. एका आर्थाने त्यांनी ग्रामसंस्कृतीचे दर्शन आपल्या व्यक्तीमत्वातून घडविले.त्यामुळेच ते संयमी होते. त्यांच्या विचारांचा जागर अंबाजोगाईत गेल्या 33 वर्षांपासुन होत आहे. हे स्तुत्य आहे. पश्चिम महाराष्ट्रात ही असा कार्यक्रम होत नाही, महाराष्ट्र हा अज्ञानाच्या उत्पादनाचा प्रदेश बनत चालला आहे,आपले लेखक अप्रबुद्ध आहेत. त्यांना भेदनिती वाढविणे यातच अधिक स्वारस्य आहे.आपण लिलावाच्या संस्कृतीत जगत आहोत. त्यामुळे आपला इतिहास जगाशी जोडून पाहिला शिका. कृषी संस्कृती नंतर भूतलावर इतर संस्कृती निर्माण झाल्या,विज्ञानवादी व्हा,मुक्तपणे व्यक्त व्हा असे आवाहन डॉ.पाटील यांनी यावेळी केले.

प्रारंभी प्रास्ताविक करताना दगडू लोमटे यांनी यावर्षीचा समारोह अत्यंत उत्साहात साजरा झाल्याचे सांगुन यासाठी अंबाजोगाईतील रसिकश्रोते,विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी भरभरून प्रतिसाद दिला व प्रसार माध्यमातून मोठी प्रसिद्धी दिल्याबद्दल सर्व वर्तमानपत्रांचे संपादक, वार्ताहर तसेच सर्व इलेक्ट्रॉनीक माध्यमांचे आभार मानले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनी करून दिला.तर सत्कारमुर्तींचा परिचय मनोज शिंदे यांनी करून दिला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ साहित्यीक मधु जामकर यांनी अंबाजोगाईशी निगडीत आठवणी सांगितल्या. तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलु उलगडून दाखविले. डॉ.बी.बी.ठोंबरे यांनी शेतकर्‍यांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता येण्यासाठी शेतीपुरक उद्योगांची उभारणी व दुष्काळ निर्मुलनासाठी दिर्घकालीन उपाययोजना तयार कराव्या लागतील तरच मराठवाड्यात शेती व शेतकरी टिकेल असे सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते यावेळी डॉ.बी.बी.ठोंबरे यांना यशवंतराव चव्हाण कृषी पुरस्कार, प्रा.मधु जामकर यांना यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, श्रीमती राजकुंवर आठवले यांना यशवंतराव चव्हाण संगीत पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.पुरस्काराचे स्वरूप 5 हजार रूपये रोख, शाल,स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ असे होते.या कार्यक्रमात समारोह परिसरात छायाचित्र प्रदर्शनात सहभाग घेतल्याबद्दल छायाचित्रकार मुन्ना सोमाणी,विजय लोखंडे,शंतनु सोमवंशी,सुशांत सोमवंशी,डॉ.अविनाश मुंडे,निरज गौड, डॉ.उदय जोशी,राजवीर मेहता यांचाही सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार प्रा.मेघराज पवळे यांनी मानले. समारोप समारंभासाठी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला,युवक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.