यवतमाळमध्ये आरोपीच्या हल्ल्यात पोलीसाचा मृत्यू

0

यवतमाळ-यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर आरोपीनेच हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र कुमेथे (वय ५०) यांचा मृत्यू झाला असून जमादार मधूकर मुके (वय ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. अनिल आत्राम असे आरोपीचे नाव आहे.

अनिल आत्राम याच्यावर एका महिलेला मारहाण केल्याचा आरोप होता. या प्रकरणी अनिल आत्राम याला अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक रविवारी रात्री घटनास्थळी गेले. यादरम्यान आरोपी अनिल आत्राम याने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात कुमेथे आणि मुके हे दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोवर कुमेथे यांचा मृत्यू झाला होता. तर मुके यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेने यवतमाळमधील पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.