यवतमाळच्या तरूणाची जळगावात वीरूगीरी

0

जळगाव- शहरातील फ्रुट गल्लीतील विजेच्या खांब्यावर असलेल्या स्ट्रीट लाईटवर बसलेल्या तरूणाने शिवीगाळ करून खाली उडी मारण्याची धमकी देत तब्बल एक तास गोंधळ घातल्याची घटना दुपारी 3.25 वाजेच्या सुमारास घडली. यावेळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. काहींनी या तरूणाला मोबाईल फोनमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी 4.15 वाजता त्याला के्रनच्या सहाय्याने मनपा कर्मचार्‍यांनी त्याला खाली उतरविले. विद्युत खांब्यावर तो कशासाठी चढला होता याची अधिक माहिती समोर येवू शकली नाही. अश्विन निवृत्ती इंगोल असे या तरूणाचे नाव असून तो यवतमाळ जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. गुरूवारी शहर पोलिस स्टेशनला दुपारी 3.25 वाजेच्या सुमारास फोन आला. की, फ्रूट गल्लीतील विजेच्या खांबावर एक तरूण वर चढून स्ट्रीट लाइटवर बसला आहे. तो वरून सर्वांना शिविगाळ करीत असल्याचेही फोनवरून पोलिसांना माहिती मिळली. त्यानंतर शहर पोलिस स्टेशनचे दुष्यंत खैरनार, संजय भालेराव हे काही कर्मचार्‍यांना घेऊन घटनास्थळावर पोहोचले. त्यावेळी त्याला खाली उरतरण्यास सांगितले. मात्र तो वरून शिविगाळ करून खाली उडी मारण्याची धमकी देत होता. त्यानंतर पोलिसांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कार्यालयात फोन करून अग्निशमन बंब बोलविला. दुपारी 3.55 वाजेच्या सुमारास अग्निशमन बंब घटनास्थळावर आला. खांबाजवळ सिडी लावत असताना त्याने पुन्हा उडी मारून देण्याची धमकी दिली. यानंतर त्याने अग्निशमनबंबाला परत घेऊन जाण्याचा इशारा केला.

 विजेच्या तारांना पकडण्याची धमकी
महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी अग्निशमन बंब समोर उभा केला. तसेच खांबाच्या एका बाजुने जाळी धरली. त्यामुळे त्याचे लक्ष अग्निशमन बंब आणि जाळी कडेच होते. त्यानंतर प्रकाश मेडिकलच्या बाजुने विज विभागाची क्रेन बोलावली. मात्र त्याचे लक्ष अग्निशमन बंबाकडे खिळवून ठेवले. त्यानंतर 4.06 वाजेच्या सुमारास त्याच्या मागून क्रेन वर केली. त्यात महापालिकेचे धनराज सपके आणि शशिकांत बारी हे दोन्ही कर्मचारी होते. त्यांनी अजिबात आवज न करता त्याच्या पर्यंत पोहोचले. मात्र क्रेन जवळ आल्याचे तरूणाच्या लक्षात आल्यानंतर त्याने विजेच्या तारांना पकडण्याची धमकी दिली. मात्र धनराज यांनी त्याचा हात पकडून आत ओढले. तरीही त्याने खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही कर्मचार्‍यांनी त्याला ओढून आत बसलवले. 4.15 वाजेच्या सुमारास त्याला खाली उतरविले. त्यानंतर त्याला शहर पोलिस ठाण्यात आणले.

तरूण यवतमाळ जिल्ह्यातला….
पोलिसांनी ताब्यात घेऊन त्या तरूणाला शहर पोलिस ठाण्यात आणले. त्यावेळी त्याने त्याचे नाव अश्विन निवृत्ती इंगोले (वय 35, रा. वाई मेंढी, ता. दिग्रस, जि. यवतमाळ) असे सांगितले. तो शेतमजूर असून त्याला पत्नी आणि दोन मुले असल्याचेही त्याने सांगितले. मात्र तो खांबावर कशासाठी चढला. असे विचारले असतात मला मारत होते. त्यामुळे घाबरून खांबावर चढल्याचे तो वारंवार सांगत होता. तो 6 डिसेंबर रोजी मुंबई येथील नातेवाइकांकडे गेला होता. चैत्यभूमीचे दर्शन घेऊन बुधवारी रात्री तो रेल्वेने नागपूरकडे चालला होता. मात्र जळगाव रेल्वेस्थानकावर उतरला. त्याला कोण मारणार होते?… कोण त्याच्या मागे लागले होते?… या प्रश्नांची तो उत्तरेच देत नव्हता. पोलिसांनी त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून त्याच्या बदलापूर येथील चुलत बहिणीकडे फोन लावला. त्यानंतर त्याची ओळख पटली.