यंदा पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी नाही: उपमुख्यमंत्री

0

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ‘कोरोना’ बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाबाबत समाधान व्यक्त करतानाच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करणे, मृत्यू दर कमी ठेवणे, चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे तसेच इतर आजार असणाऱ्या व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार आणि विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. आज शुक्रवारी १४ ऑगस्टला त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी देता येणार नसल्याचेही सांगितले. गणेश विसर्जनाला परवानगी दिल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कमीत कमी ५५ लाख लोक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे त्यामुळे ते शक्य नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी आपण प्रत्येक उत्सव साधेपणाने साजरा करत प्रशासनाला सहकार्य करत आहोत.तसेच गणेश उत्सव देखील करण्यात यावा.त्याचप्रमाणे गणेश विसर्जनाला परवानगी देणे शक्य नाही असेही पवार यांनी यावेळी अधोरेखित केले.

गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा (रक्तद्रव) थेरपी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य उपसंचालक संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, डॉ. दिलीप कदम यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.