यंदाही सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता

0

पुणे: मोसमी पावसावर यंदा एल निनो घटकाचा प्रभाव राहील व त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याचे अभ्यासक वर्तवत असले, तरी यंदा देशात व विशेषतः राज्यात सरासरीपेक्षा अदिक पाऊस पडेल, असा प्राथमिक अंदाज राज्यातील हवामानाच्या अभ्यासकांनी वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीस विदर्भ, मराठवाड्याच्या पूर्व भागात वादळी वार्‍यासह पाऊस पडण्याची शक्यताही व्रतवण्यात येत आहे.

देशात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस जाला. मात्र, यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मोसमी पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज हवामान खात्याच्या दिल्लीतील वरिष्ठ अभ्यासकांनी वर्तवला आहे. मात्र, राज्यातील अभ्यासकांना हा अंदाज मान्य नाही. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहील, असे या अभ्यासकांचे मत आहे.

ला निना इफेक्ट
एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होते. या उलट ला लिनामुळे सरासरीपेक्षा अधिक पाऊस होतो. राज्यातील सध्याचे वातावरण पाहता या ला लिना घटकामुळे अधिक पाऊस होईल, असे या अभ्यासकांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले.

सकारात्मक संकेत
हवामानाचे ज्येष्ठ अभ्यासक व राज्याचे माजी सल्लागार डॉ. रामचंद्र साबळे जनशक्तिशी बोलताना म्हणाले, भिरा, मालेगाव व अकोला येथील मार्चमधील तापमान हा मोसमी पावसाचा प्रमुख इंडिकेटर आहे. या तिन्ही ठिकाणी फेब्रुवारीच्या अखेरीसच तापमान 41 अंशांवर गेले असून, उत्तम पावसासाठी हे सकारात्मक संकेत आहेत. मार्च, एप्रिल व मेमध्ये उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. या वाढत्या तापमानामुळे हवेचा दाब कमी होऊन कमी दाबाचे पट्टे तयार होतात. त्यांची तीव्रता वाढली, की त्या बाजूकडे वारे वाहू लागतात आणि हे वारेच बाप्ष घेऊन येतात. सध्या असे पट्टे तयार होऊ लागले आहेत.

गारपिटीची शक्यता नाही
विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व भागात आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांत असे कमी दाबाचे पट्टे तयार जाले आहेत. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस या भागात वादळी वार्‍यासह पाऊस होण्याची शक्यता असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले. तसेच, गारपिटीची शक्यता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पाऊस वेळेवर येणार
येत्या तीन महिन्यांत तापमान कसे व किती राहणार, यावर पावसाचे गणित अवलंबून आहे. मात्र, सध्याच उन्हाचा कडका लक्षात घेता पुढील तीन महिने तापमान अधिक उष्णच राहील, असे दिसते. त्यातच ला लिना घटकामुळे यंदा ठरल्या वेळेनुसार पाऊस बरसू लागेल, असा अंदाजही डॉ. साबळे यांनी व्यक्त केला.