म्हणूनच पार पडली जळगाव पीपल्स बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक

न्यायालयाने स्थगिती दिलेली नव्हती, शासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत प्रक्रिया – भालचंद्र पाटील

जळगाव – जळगाव पीपल्स को. ऑप बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. यावेळी 14 संचालक बिनविरोध निवडून आले मात्र, ही निवडणूक बेकायदेशीर असल्याचा आरोप काहींनी केला आहे, तर शासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत व पारदर्शीपणे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये आमचा कोणताच हस्तक्षेप नव्हता, अशी प्रतिक्रिया बँकेचे मावळते अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी ‘जनशक्ती’शी बोलताना दिली.

भालचंद्र पाटील म्हणाले की, निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर असल्याच्या आरोपात तथ्य नाही. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. त्यावर 19 रोजी, कामकाज झाले. त्यानंतर पुढील सुनावणीसाठी 3 मे तारीख देण्यात आली. खंडपीठाने गेल्या सुनावणीवेळी बँकेची निवडणूक बेकायदेशीर ठरवली नाही किंवा या प्रक्रियेवर स्थगितीदेखील दिली नाही. त्यामुळे पूर्वघोषित कार्यक्रमानुसार 24 एप्रिल रोजी, बँकेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. ही सर्व प्रक्रिया शासनाच्या वर्ग एक अधिकाऱ्याच्या देखरेखीत पारदर्शीपणे पार पडली. त्यामध्ये आमचा किंवा बँकेचा कोणताच हस्तक्षेप नव्हता, असेही भालचंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडीसाठी 30 एप्रिल रोजी, संचालक मंडळाची सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

बँक मुख्यालयाच्या नवीन वास्तु संदर्भातील प्रश्‍नावर भालचंद्र पाटील यांनी सांगितले की, ही वास्तू औद्योगिक वसाहतीमधील जागेत प्रस्तावित आहे. तिचे बांधकाम करताना पुढील 100 वर्षांतील गरजांचा विचार करून आराखडा तयार करण्यात येणार आहे. निधीची उपलब्धता होताच हे काम सुरू होईल. विद्यमान मुख्यालयदेखील 50 ते 60 वर्षांचा विचार करून उभारण्यात आले होते, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

सन 2021-2026 संचालक मंडळाची निवड

बँकेच्या निवेदनानुसार, दि जळगाव पीपल्स को ऑप बँकेची संचालक मंडळ सदस्यांची 2021-2026 या कालावधीकरिता निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी एन. डी. करे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेस ऑनलाइन पद्धतीने सुमारे 600 पेक्षा जास्त सभासदांची उपस्थिती होती.

या निवडणुकीकरिता एकूण 27 सभासदांनी नामनिर्देशन पत्रे घेतली होती. त्यापैकी 24 सभासदांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नामनिर्देशन पत्राच्या छाननीमध्ये 9 उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले, तर एका उमेदवाराने नामनिर्देशन पत्र माघारी घेतले. अर्ज माघारीनंतर 14 उमेदवारांचे अर्ज बाकी राहल्याने, हे उमेदवार बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सभेमध्ये जाहीर केले.

बँकेचे नवनिर्वाचित संचालक मंडळ
भालचंद्र प्रभाकर पाटील, प्रकाश मांगीलाल कोठारी, चंद्रकांत बळीराम चौधरी, सुनिल प्रभाकर पाटील, रामेश्वर आनंदराम जाखेटे, प्रविण वासुदेव खडके, ज्ञानेश्वर एकनाथ मोराणकर, अनिकेत भालचंद्र पाटील, चंदन सुधाकर अत्तरदे, विलास चुडामण बोरोले, सुहास बाबुराव महाजन, स्मिता प्रकाश पाटील, सुरेखा विलास चौधरी, राजेश धिरजलाल परमार