मौका सभी को मिलता है!

0

इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पुण्यातील धडाकेबाज शतकी खेळीनंतर केदार जाधव एकदम प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यात कोलकात्यातील सामन्यात केवळ संघालाच नव्हे, तर कोट्यवधी भारतीयांना विजयाची आस दाखवणार्‍या केदार जाधववर तर सगळेच आता फिदा आहेत. त्यामुळे सामना संपल्यावर कर्णधार म्हणून बोलताना विराट कोहलीनेही केदार जाधवच्या कामगिरीचा उल्लेख केला. सोशल मीडियावर, तर इंग्लंडने एक सामना जिंकला, पण केदारने तर कोट्यवधी भारतीयांना जिंकल्याचे सांगणारा फोटो व्हायरल झाला. या मालिकेतील झंझावती फलंदाजीमुळे 31 वर्षीय केदारने भारतीय संघातील स्थानही पक्के केले आहे. खरंतर केदार हा काही उपजतच मिळालेला क्रिकेटपटू नाही, वयोगटाच्या किंवा शालेय क्रिकेट खेळून भारतीय संघात आलेला क्रिकेटपटू नाही. मुळात साधारणपणे ज्या वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे वेध लागतात त्या 29 व्या वर्षी केदारने दोन वर्षांपूर्वी भारतीय संघात पदार्पण केले. त्यावेळी तो केवळ भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथ असणार असेच वाटत होते.

अगदी 10 ते 12 वर्षांपूर्वी राष्ट्रीय संघात जागा मिळवणारा महाराष्ट्राचा अभिजित काळे चर्चेत होता त्यानंतर या संघातील कोणीच चर्चेत नव्हता. चांगली फलंदाजी करणारा केदारही त्याला अपवाद नव्हता. रणजी स्पर्धेत केदारने 2008-09 च्या हंगामात सहा सामन्यांमधून 72.33च्या सरासरीने 650 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. केदारने 2012-13 मधील मोसमात उत्तर प्रदेश विरुद्धच्या सामन्यात 327 चेंडूंमध्ये 312 धावांची त्रिशतकी खेळी केली होती. रणजी स्पर्धेपेक्षा बहुचर्चित आयपीएलने केदारला ओळख मिळवून दिली. आयपीएलमधील पदार्पणातील सामन्यातच केदारने 27 चेंडूंत 50 धावा करत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला होता. आयपीएलमुळे केदारवर मधल्या फळीतला आक्रमक फलंदाज असा शिक्का बसला.

भारतीय संघाच्या मधल्या फळीत जागा मिळवायची म्हणजे तुम्ही 19 वर्षांखालील संघातून खेळलेले किंवा क्लब क्रिकेटमध्ये एखादा करिष्मा दाखवलेला पाहिजे. केदारकडे या दोन्ही गोष्टी नव्हत्या. कारण केदारने वयाच्या 24 व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिला सामना खेळला होता. त्यात केदारप्रमाणे मधल्या फळीत खेळणारे अनेक जण भारतीय संघाचा दरवाजा ठोठावत होते. त्यामुळे भारतीय संघात येण्यासाठी केदारला अचाट कामगिरीच करावी लागणार होती. घरच्या मैदानावर रंगणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी फलंदाजीऐवजी त्याच्या वेगळ्या शैलीच्या गोलंदाजीने भारतीय संघाचा दरवाजा उघडून दिला. सर्वसाधारणपणे मायदेशात होणार्‍या एकदिवसीय सामन्यांसाठी चार मुख्य गोलंदाज आणि मधल्या फळीत फलंदाजी करू शकेल, असा कामचलाऊ गोलंदाज संघात ठेवायचा हे भारतीय संघाचे सूत्र ठरलेले आहे. या सगळ्या गोष्टींमुळे केदारने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघातील जागा राखली ती केवळ निवड समितीच्या दृष्टिकोनामुळे. केदारनेही मिळालेल्या संधीचे सोने केले.

पुण्यातील 120 धावा आणि कोलाकात्यातील 90 धावांच्या खेळीमुळे अचानकपणे केदार नावाचा मॅचफिनिशर भारतीय संघाला मिळाला आहे. केदारमुळे मधल्या फळीत खेळण्यासाठी कर्णधारपद सोेडणार्‍या धोनीच्या खाद्यांवरचा भार हलका होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत केदारला संधी मिळाली आणि त्या संधीचे त्याने सोने केले. भारतीय क्रिकेटमध्ये केदारयुगाचा प्रारंभ झाला, असे म्हणायला काहीच हरकत नसावी.

– विशाल मोरेकर
9869448117