मोहल्ला अस्सी, रईस चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदीची मागणी

0

जळगाव : जानेवारी महिन्यात प्रदर्शित होत असलेल्या ‘मोहल्ला अस्सी’ चित्रपटात हिंदूंचे दैवत तसेच पवित्र तीर्थक्षेत्र काशी यांचा अवमान करण्यात आला आहे. तसेच माहिरा खान या पाकिस्तानी अभिनेत्रीची मुख्य भूमिका असलेला ‘रईस’ नामक चित्रपट प्रदर्शित होत आहे. उरी येथील आक्रमणानंतर संपूर्ण भारतात पाकिस्तानच्या विरोधात जनभावना तीव्र आहेत. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांच्या विरोधात असणार्‍या या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, अशा मागणीचे निवेदन हिंदू संघटनांकडून जळगावमधील राजकमल, अशोक, नटवर मल्टिप्लेक्स, मेट्रो, रिगल आणि आयनॉक्स या 6 मुख्य चित्रपटगृहांना देण्यात आले.

कठोर कारवाई करा
या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, काशी हे जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे ‘मोहल्ला अस्सी’ या चित्रपटावर तात्काळ बंदी आणावी आणि संबंधितांवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कठोर कारवाई करावी. 25 जानेवारी 2017 या दिवशी माहिरा खान या पाकिस्तानी अभिनेत्रीची मुख्य भूमिका असलेला ‘रईस’ नामक चित्रपट प्रदर्शित होत आहे. भारतीय नागरिकांच्या राष्ट्रभावना लक्षात घेता ‘रईस’ या चित्रपटावर बंदी घालावी.

यांची होती उपस्थिती
हे चित्रपट लावण्यास चित्रगृह चालकांनीही नकार देऊन राष्ट्र आणि धर्म कार्यात त्यांचा वाटा उचलावा अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. चित्रपटगृहातील कर्मचार्‍यांनी या मागणीला सकारात्मक दिला. यावेळी आकाश पाटील, दिनेश माने, गजानन ढाकरे, ललीत चौधरी, खेमराज भंगाळे, गणेश भंगाळे, धनराज तांबट, यशपाल ठाकूर, डिगंबर सोनवणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हर्षल, विश्‍व हिंदु परिषदेचे योगेश ठाकूर, बजरंग दलाचे मनोज पाटील, समितीचे सचिन वैद्य, प्रशांत जुवेकर, दीपक राजपूत आदी उपस्थित होते.