मोबाईल चोरीतील संशयितांना 16 पर्यंत पोलिस कोठडी

0

जळगाव। शिवतीर्थ मैदानासमोरील वायरलेस वर्ल्ड मोबाइलच्या दुकानात 6 एप्रिल रोजी रात्री चोरट्यांनी 17 लाख रुपये किमतीचे 107 मोबाइल लंपास केले होते. अशाच प्रकारच्या गुन्ह्यात औरंगाबाद पोलिसांनी तिन संशयितांना अटक केली होती. त्यानंतर या तिघांना मंगळवारी रात्री जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली. त्यांना गुरूवारी मुख्य न्यायदंडाधिकारी के.एस. कुलकर्णी यांच्या न्यालयात हजर केले असता 16 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

औरंगाबाद शहरातील क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत 14 एप्रिल रोजी रात्री अशाच पद्धतीने मोबाइल चोरीची घटना घडली होती. त्याच दिवशी रात्री क्रांतीचौक पोलिसांच्या गस्तीच्या पथकाला तीन संशयीत फिरताना आढळले होते. पोलिसांनी त्यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याजवळ चोरी केलेले मोबाइल सापडले होते. त्यात मिन्टूकुमार देविकांत ठाकूर (वय 22, रा. बिसनपुरा, जि. मोतीहारा, बिहार), समीर शहा मुस्तफा देवान (वय 28, रा. जगदंबानगर, जि. मोतीहारा), अब्दुल कादीर अस्लम देवान (वय 28, रा. पकईटोला, जि. मोतीहारा) यांचा समावेश होता. मात्र अंधाराचा फायदा घेत त्यांचे त्यांचे बाकी साथीदार फरार झाले होते. त्यांना जिल्हापेठ पोलिसांनी बुधवारी अटक करून गुरूवारी न्यायाधीश कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी 16 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.

दोन दिवस केली रेकी…
बिहारमधील मोतीहारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील सात तरूण दिल्लीला गेले. त्यात समीर शहा याचा मामाचा मुलगा दिल्ली येथे फळविक्रेता आहे. त्याला सोबत घेऊन आठजण दादर अमृतसर एक्स्प्रेसने एप्रिल महिन्यात मनमाड येथे उतरले. त्यानंतर ते येवला येथे बसने गेले. काही वेळाने ते बसनेच औरंगाबाद येथे गेले. त्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या लॉज मध्ये चार, चार जणांनी रुमकरून राहिले. दोन दिवस रेकी केल्यानंतर क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी दुकान फोडून चोरी केली. मात्र पोलिसांच्या गस्तीच्या पथकाला ते सापडले. त्यातील पाच जण फरार होण्यात यशस्वी झाले. त्यात त्यांचा मुख्य सूत्रधार सुरेंद्र सिंग हा सुद्धा होता. त्याला शोधण्यासाठी औरंगाबाद पोलिस बिहारमध्ये जाऊन आले. मात्र सर्व चोरटे नेपाळमध्ये पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे.