मोबाईल चोरट्यांचा सुळसुळात; सहा मोबाईल लंपास

0

जळगाव। गोदावरी अभियांत्रीकी, रायसोनी कॉलेज शिरसोली येथुन विद्यार्थ्यांचे मोबाईल लांबवण्यात आले असुन शहरातील फुलेमार्केट मधुन एका व्यापार्‍याच्या खिश्यातून चक्क 65 हजार रुपये किंमतीचा महागडा मोबाईल चोरी गेल्याची घटना समोर आल्या असून याप्रकरणी शहर व एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाईल चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात घरफोड्यानंतर आता मोबाईल चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. यांना आळा कधी बसणार असा सवाल सर्व सामान्य नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

शहर पोलिस ठाण्यासह एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
आदर्शनगर येथील दालमील उद्योजक विनेश सुंदरलाल पारप्यानी व त्याचा मित्र दिनेश जगताप दोघांच्या खिश्यातून एकामागुन एक मोबाईल चोरट्याने लांबवले. पारप्यानी हे व्यापारी कामानिमीत्त 22 एप्रील शनिवारी दुपारी 2 फुलेमार्केट मध्ये आले होते. ज्योतीक्रिएशन या दुकाना समोरुन जात असतांना बाजारातील रेटारेटीचा गैर फायदा घेत अज्ञात चोरट्याने पारप्यानी यांच्या वरील खिश्यातून महागडा मोबाईल लंपास केला. साधारण 65 हजार रुपये किंमतीचा मोबाईल गेल्याने पारप्यानी यांनी शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. दोन दिवस शोध घेतल्यावर आज शहर पोलिसांत अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहाडीरोडवरील जिवन मोती सोसायटी येथील रहिवासी दिनेश गोपाळराव जगताप यांच्या पत्नीसह 24 एप्रील रोजी फुलेमार्केट मध्ये आले असतांना त्याच ज्योतीक्रियेशन समोरुन जातांना त्याचा 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने तशात पद्धतीने काढून पोबारा केला.

गोदावरीतून बॅग लंपास
गोदावरी अभियांत्रीकी महाविद्यालयात अभियांत्रीकीची परिक्षा सुरु आहे. वर्गाबाहेर ठेवण्यात येणार्‍या दप्तरातून येथेही मोबाईल लंपास झाले आहे. डीप्लोमाचे शिक्षण घेत असलेल्या वैभव मनोहर वराडे यांच्या दप्तरात ठेवण्यात आलेले दोघा विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीला गेले असुन. वराडे याच्या दप्तरासह चोरट्याने मोबाईल लंपास केले.

विद्यार्थ्यांचे मोबाईल लंपास
शिरसोली रोडवरील रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरींग या महाविद्यालयात वर्गामधुन एक व वर्गाबाहेर पार्कींग मधुन एक असे दोन मोबाईल चोरी झाल्याची घटना आज बुधवारी घडली. त्यात अंतुर्ली येथील रहिवासी विद्यार्थी रोहन अशोक महाजन हा अभियांत्रीकीच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत असुन परिक्षागृहात मोबाईल नेण्यास परवानगी नसल्याने त्याने पार्कींग मध्ये उभ्या दुचाकीच्या डीक्कीत ठेवलेल्या दप्तरात मोबाईल ठेवला होता. आयफोन कंपनीचा 35 हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने दुचाकीची डीक्की उघडून पळवला आहे. तर याच वेळात वर्गाबाहेर ठेवलेल्या दप्तरांतुन आणखीएक महागडा मोबाईल चोरीला गेला आहे. एमआयडीसी पोलिसात ठाण्यात या बाबत नोंद करण्यात आली आहे.