Private Advt

मोबाईल चोरटा भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : डाऊन सेवाग्राम एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या महिला प्रवाशाच्या हातातून मोबाईल लांबवणार्‍या चोरट्याच्या भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मयूर उर्फ भैय्या संजू अंभोरे (22, संविधान नगर, हुडको कॉलनी, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून 11 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला.

भुसावळ स्थानक येण्यापूर्वी लांबवला मोबाईल
फिर्यादी समशेर अली मलिक (60, अलमास कॉलनी, नेहरू कवसा कब्रस्थान, मुंब्रा, जि.ठाणे) हे पत्नीसह 15 डिसेंबर 2021 रोजी 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसने ठाणे ते अकोला असा प्रवास कोच क्रमांक एस- 4 च्या बर्थ क्रमांक 65 वरून करीत होते. भुसावळ स्थानक येण्याच्या आधी संशयीत आरोपीने फिर्यादी यांच्या बर्थजवळ येवून कोणते स्थानक आले? म्हणून विचारणा करीत त्यांच्या पत्नीच्या हातातील 11 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा आरोपी मयूर अंभोरेकडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली व चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय घेर्डे, सहा.निरीक्षक बी.एस.मगरे, एएसआय सुनील इंगळे, हवालदार जगदीश ठाकूर, हवालदार सागर खंडारे, हवालदार अजित तडवी, नाईक सचिन दैवे आदींच्या पथकाने केली.