मोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद!

0

निमखेडी रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणार्‍यांच्या भावना : महापौरांनी पहाटे जाऊन घेतली नागरिकांची भेट

जळगाव: शहरात एलईडी बसविण्याचे काम जोरात सुरू असून महापौर भारती सोनवणे स्वतः फिरून नागरिकांशी चर्चा करीत आहे. सुरत रेल्वे गेटपासून निमखेडी मुख्य रस्त्यावर एलईडी बसविण्याचे काम पूर्ण झाले असून रविवारी पहाटे 5.30 वाजता जाऊन नागरिकांशी चर्चा केली. पूर्वी ज्या रस्त्यावरून मॉर्निंग वॉक करताना मोबाईलचा टॉर्च लावून फिरावे लागत होते त्या रस्त्यावर आज आम्ही बिनधास्त फिरू शकत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

निमखेडी मुख्य रस्त्यावर एलईडी बसविण्यात आले असून रस्त्यावर लक्ख प्रकाश पडल्याने नागरिकांना समाधान वाटत आहे. रविवारी सकाळी 5.30 वाजताच महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सुरत रेल्वे गेटपासून निमखेडीपर्यंत पायी फिरून एलईडीची पाहणी केली. यावेळी महापौरांसोबत भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विद्युत विभाग सभापती गायत्री राणे, नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ.चंद्रशेखर पाटील आदींचा सहभाग होता.

एलईडीमुळे त्रास झाला दूर
सुरत रेल्वे गेटपासून चंदू अण्णा चौक आणि मुख्य रस्त्यावर एलईडी बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. निमखेडी रस्त्यावर मोठ्याप्रमाणात अंधार असल्याने मॉर्निंग वॉक करणार्‍या नागरिकांना त्रास होत होता. मोबाईलचा टॉर्चने किंवा हातात बॅटरी घेऊन नागरिकांना मॉर्निंग वॉक करावे लागत होते. एलईडी बसविल्याने नागरिकांचा त्रास वाचला असून त्यांनी महापौरांचे आभार मानले. महापौर चर्चा करीत असताना नागरिकांनी काही समस्या मांडल्या. परिसरात अनेक ठिकाणी अमृत योजनेच्या चार्‍या खोदलेल्या असून त्यामुळे अपघात होत असल्याने त्या त्वरित बुजवाव्या. ज्याप्रमाणे मुख्य रस्त्याचार एलईडी बसविण्यात आले तसेच गल्लीबोळात आणि शिवधाम मंदिर परिसर, निमखेडी शिवार याठिकाणी देखील लवकरात लवकर एलईडी बसवावे अशी मागणी नागरिकांनी केली. महापौर भारती सोनवणे यांनी समस्या दूर करण्यासंदर्भात अधिकार्‍यांना सूचना देण्याचे आश्वासन दिले.

Copy