मोबदल्यासाठी शेतकर्‍यांचे जिल्हाभर कामबंद

0

साक्री । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 च्या चौपदरीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. रस्त्याच्या कामात शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या असून शेतकर्‍यांना त्यांचा मोबदल्याची किंमत पुर्णतः अदा केली नाही व वाढीव रक्कम लवकरात लवकर मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी संपुर्ण जिल्ह्यात काम बंद आंदोलन केले. धुळे, कुसुंबा, नेर साक्री व नवापुर या ठिकाणी चालू असलेले कामकाज शेतकर्‍यांनी बंद केले आहे. रस्त्याच्या कामासाठी दोन ठिकाणी कंपनीच्या कामगार व अधिकार्‍यांची निवासस्थाने आहेत. तेथे शेतकर्‍यांनी जाऊन कंपनीच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकारी भेटले नसल्याने शेतकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शेतकरी व कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक
कंपनीचे अधिकारी व प्रकल्प संचालक जोपर्यंत शेतकर्‍यांशी संवाद साधत नाही तोपर्यंत कामकाज बंद राहिले व जर कोणी कंपनीच्या अधिकार्‍यांशी संगनमत करून व गुंडाच्या दबावाखाली काम चालू केले तर शेतकरी आपल्या पद्धतीने उत्तर देणार असल्याचे यावेळी संजय मराठे यांनी सांगितले. आंदोलनात साक्रीचे शेतकरी संजय माठे, सागर टाटीया, संजय सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, विरू जैन यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कंपनीच्या अधिकार्‍यांशी मोबाईलवरून संवाद साधला असता मोबाईलवर संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे शेतकरी व कर्मचारी यांची शाब्दीक चकमक झाली. यावेळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. चौपदराकरणाचे काम बंद आंदोलन 1 तारखेपासून पुकारले आहे. 8 मे रोजी सकाळी साक्री, धुळे, नवापूर नेट, कुसुंबा येथील शेतकर्‍यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी काही ठिकाणी काम सुरू होते ते काम बंद पडले व काम बंद ठेवा अन्यथा होणार्‍या परिणामास सर्वस्वी जबाबदार कंपनी राहील, असे यावेळी शेतकर्‍यांना सांगितले.