मोदी सरकारपेक्षा दिल्ली सरकारचे काम सरस; केजरीवालांचे भाजपला चर्चेचे खुले आव्हान

0

दिल्ली- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारपेक्षा 10 पट जास्त कामे केल्याचा दावा केला आहे. याशिवाय त्यांनी केलेल्या कामांबाबत खुली चर्चा करण्याचे आव्हान भाजप अध्यक्ष अमित शाह यांना दिले आहे.

‘केजरीवालजी, या चार वर्षांमध्ये तुम्ही दिल्लीकरांसाठी काय काम केले? दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा एकच मूलमंत्र आहे. खोटे बोलणे आणि वारंवार रेटून खोटे बोलणे,’ असे ट्विट भाजपाने केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना केजरीवालांनी हे आव्हान दिली आहे.

अमित शाह यांनी, ‘काँग्रेस सरकारने १३ व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत पूर्वांचलच्या विकासासाठी केवळ ४ लाख कोटी रुपयांचा निधी दिला होता. मोदी सरकारने मात्र १४ व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत ही रक्कम जवळपास तिप्पट करुन १३ लाख ८० हजार कोटी रुपयांचा निधी पूर्वांचलसाठी दिले असे म्हटले होते. त्यावर उत्तर देताना केजरीवाल यांनी ‘१४ व्या वित्त आयोगांतर्गत दिल्लीला केवळ ३२५ कोटी रुपयांचा निधी का दिला, असा प्रश्न केजरीवाल यांनी अमित शाहंना विचारला. दिल्लीमध्येही पूर्वांचलचे लोक राहतात. मग त्यांच्या विकासासाठी पैसे का नाही दिले? दिल्लीमध्ये राहणाऱ्या पूर्वांचलच्या लोकांसोबत भेदभाव का’, असा प्रश्नही केजरीवाल यांनी ट्विटरवरुन विचारला.