मोदी मॅजिक 2019 मधेही

0

वॉशिंग्टंन। देशात नुकत्याच झालेल्या विधानसभांच्या निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या यशाची चर्चा जगभरात होत आहे. या निवडणुकांमध्ये भाजपने मारलेली मुसंडी पाहिल्यावर देशात 2019 मध्ये होणार्‍या लोकसभांच्या निवडणुकांमध्येही भारतीय जनता नरेंद्र मोंदींनाच पहिली पसंती देईल, असे मत अमेरिकेतील राजकिय विश्‍लेषकांनी नोंदवले आहे. याशिवाय 2019 नंतरही मोदीच देशाचे नेतृत्व करतील असा अंदाज या विश्‍लेषकांनी वर्तवला आहे.

जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापिठातील राज्यशास्त्र आणि आंतररराष्ट्रीय संबंध या विषयाचे सहाय्यक अध्यापक अ‍ॅडम जीगफेल्ड म्हणाले की, उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकतील निकालांनी स्पष्ट केले आहे की, देशात 2014 मध्ये झालेली सार्वत्रिक निवडणूक महत्त्वाची होती. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यात काही फारसे बदल झालेले नाहीत. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपचा मोठा विजय आहे. त्यांच्या उमेदवारांनी, सपा किंवा बसपाच्या विजयी उमेदवारांपेक्षा मोठ्या फरकाने विजय मिळवलेले आहेत. अमेरिकन एंटरप्राइज इंस्टिट्यूटचे निवासी फेलो सदानंद धुमे यांनी सांगितले की, भारतात 2019 मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांच्यावेळेसही मोदींनाच पहिली पसंती मिळणार हे विधानसभा निवडणुकींच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. मोदीच सगळ्यांच्या पुढे राहतील.

जॉर्ज टाऊन विद्यापिठाच्या वॉल्श स्कूल ऑफ फॉरेन सर्व्हिसचे अध्यापक इरफान नूरद्दीन यांनी मात्र 2019 मधील निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपला मित्र पक्षांची मदत घ्यावी लागेल. नूरद्दीन म्हणाले की, भाजप भारतातील सर्व राज्यांमध्ये शिस्तबद्ध आणि सुसूत्रीपणाने पाळेमुळे रुजवत आहे. त्याच्या अगदी उलट परिस्थिती विरोधी पक्षांची आहे. विरोधी पक्ष एकत्र आले तर ते भाजपला हरवू शकतात. मोदी आता जरी बहुमतात असले तरी 2019 मध्ये त्यांना बहुमत मिळणार नाही, सत्तेत बसण्यासाठी त्यांना इतरांची मदत घ्यावी लागेल.