मोदी की राहुल? 18 डिसेंबरला निकाल!

0

अहमदाबाद : गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुकांचे आज सोमवार दिनांक 18 डिसेंबररोजी मतमोजणीनंतर निकाल जाहिर होणार आहेत. पैकी संपूर्ण देशाचे लक्ष केवळ गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. येथे 22 वर्षांची सत्ता भाजप अबाधित ठेवणार की भाजपची सत्ता उलथवून काँग्रेस सत्तारूढ होणार याचा निकाल आज लागणार आहे. विविध न्यूज चॅनलच्या एक्झिट पोलने भाजपचाच विजय होणार असल्याचा अंदाज वर्तविला असला तरी पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी मात्र भाजपचा पराभव होणार असल्याचा अंदाज यापुर्वीच वर्तविला असल्याने या निकालानंतर खासदार काकडे यांच्या अंदाजाचाही निकाल लागणार आहे. या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर पाटीदार आरक्षण समितीचा नेता हार्दिक पटेल याने केलेल्या एका ट्वीटमुळेही देशात खळबळ उडाली. गुजरात निवडणुकीत वापरण्यात आलेल्या 5 हजार इव्हिएम मशीन हॅकला करण्यासाठी भाजपचे 140 अभियंते कामाला लागले असून त्याचे कंत्राट अहमदाबादच्या एका कंपनीला दिल्याचा धक्कादायक आरोप हार्दिकने केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनीही या निकालापुर्वी भाजपवर टीका केली. दरम्यान, रविवारी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गुजरातमधील सहा मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्यात आले.

…तर काकडेंना अंदाज वर्तविणे महागात पडणार
गुजरातमध्ये मोदींचाच करिष्मा चालणार असून, भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत मिळेल, असा अंदाज एक्झिट पोल देणार्‍या सर्वच वृत्तवाहिन्या व सर्वेक्षण संस्थांनी व्यक्त केला असताना भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी मात्र गुजरातमध्ये भाजपला जबरदस्त फटका बसणार असून, मित्र पक्षांची मदत घेतली तरी तेथे सत्ता मिळणार नाही, असे भाकित वर्तविले होते. काकडेंच्या या विधानाने भाजपचीही मोठी गोची झाली होती. आज गुजरातचा निकालाबरोबर खासदार काकडे यांचीही परिक्षा होणार आहे. जर भाजपला बहुतमत मिळाले तर काकडे यांना पक्षातून मोठा विरोध होऊ शकतो. तसेच, पक्षाकडून त्यांच्यावर कारवाईदेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जर भाजपचा पराभव झाला तर पुणे महापालिका निवडणुकीप्रमाणे काकडे यांच्या अंदाजाचे कौतुकही होऊ शकते. काकडे यांनी पुणे महापालिकेतील भाजपच्या विजयाबाबतही असेच भाकित वर्तविले होते. ते अगदी तंतोतंत खरे ठरले होते. मात्र, खा. काकडे यांचे गुजरातबाबतचे भाकित भाजप नेत्यांनी फेटाळून लावले आहे. त्यामुळे गुजरात निवडणुकीचा वर्तविलेला अंदाज खासदार काकडे यांना महागात पडणार की, कौतूकाचा विषय ठरणार यावर देखील आज शिक्कामोर्तब होणार आहे. खा. काकडे यांच्या गुजरातसंबंधीच्या अंदाजाला राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळाली आहे.

5 हजार इव्हीएम हॅक : हार्दिक
गुजरात विधानसभा निवडणुक निकालाच्या पार्श्‍वभूमीवर हार्दिक पटेलनेही भाजपवर टीकेची झोड उठवली. शनिवारी आणि रविवारी भाजप इव्हीएममध्ये घोटाळा करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हार्दिक पटेल यांनी शनिवारी रात्री उशीरा पुन्हा एकदा ट्विटरवरुन भाजपवर आरोप केले. अहमदाबादमधील एका कंपनीमार्फत 140 अभियंत्यांच्या मदतीने 5 हजार इव्हीएमचे सोर्स कोड हॅक करण्याची तयारी आहे असे ट्विट केले. विसनगर, पाटण, राधनपूर, टँकारा, जेतपूर, राजकोट, लाठी-बाबरा, छोटा उदयपूर, संतरामपूर, सांवली, मांगरोल, नादोद, राजपीपला, डभोई या भागात इव्हीएम हॅक करण्यात आले. पाटीदार आणि आदिवासी मतदार असलेल्या भागांनाच लक्ष्य केल्याचा आरोप हार्दिकने केला.

वातावरण वेगळेच काही सांगतेय : उद्धव ठाकरे
गुजरात निकालाविषयी प्रतिक्रिया देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, गुजरातचे वातावरण वेगळेच काही सांगत असून माध्यमांनी दाखवलेला कौल वेगळेच सांगत आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्याच्या अनेक काहाण्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तसा काही घोटाळा झाला नाही तर खरा निकाल दिसेलच. माझा मुद्दा जरा वेगळा आहे तो म्हणजे मतदाराला ईव्हीएमचे बटण दाबल्यानंतर आपले मत खरेच योग्य पक्षाला गेले आहे अथवा नाही हे कळण्याचा हक्क आहे. तो कुठे तरी डावलला जाताना दिसतो. अनेक देशांमध्ये मतपत्रिकेद्वारे मतदानाची पद्धत आहे. अशा वेळी ईव्हीएम मशीनमुळे लगेचच निकाल जाहीर होत असला तरी त्यात गडबड झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही ठाकरे यांनी विचारला.

फेरमतदानालाही गर्दी
गुजरातमधील वडगाम विधानसभा मतदारसंघातील छानिया-1 आणि छानिया-2, विरमगाम विधानसभा मतदारसंघातील बूथ नंबर 27, दस्करोई विधानसभा मतदारसंघातील नारोदा मतदान केंद्र, सावली क्षेत्रातील नहारा-1 आणि सकारदा-7 या ठिकाणी रविवारी पुन्हा मतदान पार पडले. मॉक ड्रील म्हणजे मतदानापूर्वी केलेल्या अभ्यासाचा डेटा हटवण्याचे अधिकारी विसरले होते. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा नव्याने मतदान घेण्यात आले. फेरमतदानासाठीही मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केली होती.

पाटीदार समाजाची मतदानाकडे पाठ
गुजरातच्या 2012 साली विधानसभेच्या निवडणुकीत एकून 72.02 टक्के मतदान झाले होते तर यंदा त्यात तीन टक्क्यांनी घट होऊन 68.41 टक्क्यांवर आले आहे. यंदा गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 66.75 टक्के तर दुस-या टप्प्यात 69.98 टक्के इतके असे सरासरी 68.41 मतदान झाले आहे. हे मतदान पाटीदार बहुल मतदारसंघातील आहे. त्यामुळे पाटीदार समाजाचे नेते चिंताग्रस्त झाले आहेत. गुजरातमधील मागील काही निवडणुकांतील आकडेवारी काढली तर शहरी भागात भाजपला तर ग्रामीण भागात काँग्रेसला मतदान होत असते. यंदाच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील 98 जागांसाठी जवळपास 70 टक्के मतदान झाले आहे तर शहरी भागातील 39 मतदारसंघात 65. 27 टक्के मतदान झाले तर निमशहरी भागातील 45 मतदारसंघात 68 टक्के मतदान झाले आहे. या आकडेवारीवर नजर फिरवल्यास लक्षात येते की ग्रामीण भागात सरासरी 5 टक्के मतदान जास्त झाले आहे. जेथे नेहमीच काँग्रेसचा फायदा झाला आहे.

Copy