मोदींच्या माफीनाम्यासाठी संसदेत गदारोळ

0

नवी दिल्ली । माजी पंतप्रधान तथा अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत माफी मागावी या मागणीसाठी काँग्रेससह डाव्या पक्षांनी गुरुवारी राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला, तसेच सभागृहाचे कामकाज बंद पाडले. एकीकडे काँग्रेस खासदारांचा गोंधळ सुरू असताना दुसरीकडे अण्णा द्रमुक पक्षाच्या खासदारांनीही जोरदार घोषणाबाजी सुरू केली. मुख्यमंत्रिपदी व्ही. के. शशिकला यांचा शपथविधी होण्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव हे हेतुपुरस्सर विलंब लावत असल्याचा आरोप या खासदारांनी केला.

सभापतींवर पक्षपाताचा आरोप

राज्यपालांना तातडीने बडतर्फ करावे, अशी मागणी हे खासदार करत होते. दुसरीकडे, लोकसभेतही काँग्रेसने जोरदार गदारोळ घालत सभात्याग केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर उपहासात्मक टीका केली होती. या टीकेबद्दल काँग्रेसने मोदी यांचा निषेध केला असून, पंतप्रधानांनी माफी मागितल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. मोदींची भाषा दर्जाहिन व त्यांच्या पदाला न शोभणारी होती, अशी टीका डाव्या पक्षांसह काँग्रेसने केली. पंतप्रधान किंवा मंत्र्यांच्या भाषणानंतर प्रत्त्युतर देण्याची संधी देण्याची सभागृहाची परंपरा आहे. तशी संधीही सभापती हमीद अन्सारी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना दिली नाही. त्यामुळे पंतप्रधानांच्या टीकेला सभागृहात उत्तर देता आले नाही, असा आरोपही यावेळी विरोधकांनी केला. तर सदस्यांनी तशी नोटीसच सभापतींना दिली नव्हती, असे उत्तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले व विरोधकांच्या आरोपांची हवा काढली.