मोदींचे व्हीजन-2022!

0

नवी दिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशासमोर ‘व्हीजन-2022’ मांडले. भाजपाने उत्तर प्रदेशमधील विजयाचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले असून, त्या निमित्त मोदींचा भाजपा कार्यालयात सत्कारही करण्यात आला. हा सत्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शो करत 11 अशोक रो़ड येथील भाजपा मुख्यालयाकडे आले. यावेळी पंतप्रधानांचे अभिनंदन करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते तसेच नेत्यांनी गर्दी केली होती. 2022 साली भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. याआधी संधी मिळालेल्या प्रत्येक सरकारने देशाच्या प्रगतीस हातभार लावला आहे. आम्ही प्रत्येकाचे योगदान मान्य करतो. मात्र 2022 च्या भारताच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सर्वांना एकजुटीने मोहीम हाती घ्यावी लागेल, असे आवाहन मोदींनी केले.

या भाषणात गरीबांना विकासाची संधी मिळावी म्हणून धरलेला आग्रह लक्षवेधी ठरला. त्यांनी मध्यमवर्गीयांच्या मनात व्यवस्थेबद्दल असलेली नाराजीही अधोरेखित केली. भावनिकतेचे राजकारण करणे आपल्याला मान्य नसल्याची ग्वाही देत भाजप कार्यकर्त्यांना आश्‍वस्त केले.

आदर्श भारत घडवू या!
विजयोत्सवातील भाषणाआधी पंतप्रधानांनी सविस्तर ट्विटच्या माध्यमातून आदर्श भारत घडविण्याचे आवाहन केले येत्या 2022 मध्ये भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत आहेत. तोपर्यंत महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गर्व वाटेल असा भारत आपण घडवायला हवा, असे आवाहनच नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. सध्या देशात नव्या भारताचा उदय होत आहे. 125 कोटी देशवासियांमध्ये हा नवा भारत घडविण्याची ताकद आणि क्षमता आहे आणि या नव्या भारतातील लोक विकासाच्या बाजूने आहेत. त्यामुळे जनतेने नवा भारत घडविण्याचा संकल्प करायला हवा, असे आवाहन मोदी यांनी केले आहे. नरेंद्र मोदी मोबाईल अ‍ॅपचा जास्तीत वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

विनम्र होण्याची वेळ !
भाजपला मिळालेल्या यशामुळे कार्यकर्त्यांनी हुरळून जाऊ नये असा सल्लादेखील पंतप्रधानांनी दिला. ते म्हणाले की, जगातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवते, वृक्षवेलीही शिकवतात. ज्या झाडाला फळे येतात ते झाड नेहमी झुकलेले असते. भाजपाच्या वटवृक्षाला आता विजयरूपी फळे येऊ लागली आहेत. आता आपली झुकण्याची वेळ आहे. विनम्र होण्याची वेळ आहे. देशात भावनिक मुद्यावरून अनेक लाटा येऊन गेल्या भावनिक मुद्दे नसताना मोठ्या प्रमाणावर मतदान होणे, विशेष आहे. या निवडणुकांकडे मी नव्या भारताची निर्मिती होत असल्याचे संकेत म्हणून पाहत आहे. या निवडणुकीतून देशात बहुसंख्येने असलेला युवक, महिला यांच्या आकांक्षा प्रकट झाल्या आहेत. असे मोदी म्हणाले.

शहांची स्तुतीसुमने
मोदी यांनी पक्षाच्या मुख्यालयाला भेट देऊन पं. दीनदयाल उपाध्याय यांना पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पंतप्रधानांवर स्तुतीसुमने उधळली. मोदी स्वातंत्र्यानंतरचे देशातील सर्वात लोकप्रिय नेता आहेत गरिबांचे नेते आहेत. त्यांनी गरिबी हटविण्यासाठी अभियान सुरू केले त्यामुळेच हा विजय मिळाल्याचे म्हटले. या यशात अमित शहा यांचा मोलाचा वाटा आहे. या पार्श्‍वभूमिवर त्यांनाही या विजयाचे श्रेय देण्यात येत आहे. मात्र त्यांनी याचे श्रेय हे पंतप्रधानांना दिले हे विशेष.