मोदींचे राज्य ब्रिटीशपेक्षाही जुलमी

0

नवी दिल्ली- आज दिल्लीच्या सीमेवर धडकलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला पोलिसांनी रोखले. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच त्यांच्यावर पाण्याचा माराही केला. या घटनेचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटले आहेत. दिल्लीत शेतकऱ्यांवर पोलिसांनी बळाचा वापर केल्यानंतर विरोधकांनी भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मोदी सरकार हे ब्रिटिश पेक्षाही जुलमी आहे हे दाखवून दिले आहे असे आरोप कॉंग्रेसने केले आहे. इंग्रजांनी आधी शेतकऱ्यांचे शोषण केले होते. आता मोदी सरकारही शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करत आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी भाजपा सरकारची तुलना थेट इंग्रजांशी केली. मोदी सरकार हे इंग्रजांसारखेच असल्याचे त्यांनी दाखवून दिले. इंग्रजांनी आधी शेतकऱ्यांचे शोषण केले होते. आता मोदी सरकारही शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करत आहे, असे त्यांनी सांगितले. हजारो शेतकरी त्यांच्या मागण्या घेऊन शेकडो किलोमीटर चालत तुमच्या दारी आले. जर तुम्ही खरंच महात्मा गांधी यांचे विचार आत्मसात केले असते तर तुम्ही शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याऐवजी त्यांच्या मागण्या मान्य केल्या असत्या. आता लवकरच ‘शेतकरी विरोधी-नरेंद्र मोदी’, हा नवा नारा ऐकू येईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.

‘शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश दिला पाहिजे. त्यांना दिल्लीत प्रवेश का दिला जात नाही आहे ? हे चुकीचं आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत’, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

‘किसान क्रांती पदयात्रा’ दिल्लीमध्ये अडवण्यात आली. गांधी जयंतीच्या दिवशी अहिंसेचे भान न ठेवता शेतकऱ्यांवर अश्रुधूर आणि लाठीचार्ज केला गेला. त्यामुळे भाजपाचा हिंसक चेहरा समोर आला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. देशाच्या इतिहासातील हा काळा दिवस असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Copy