मैत्रेयच्या गुंतवणुकदारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

0

जळगाव । गुंतवणूकदारांना कमी दिवसात गुंतवणुक केलेल्या रकमेच्या तुलनेत अधिक पैसा मालमत्ता देण्याचे आमिष दाखवून मैत्रेयने राज्यातील विविध शहरातील हजारो गुंतवणुकदारांची फसवणुक केली होती. त्यात जळगाव शहराचाही समावेश होता. मात्र,मैत्रेय कंपनीत गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणूक मुदत संपल्यानंतरही ठेवी मिळत नाही. त्यामुळे संतापलेल्या गुंतवणुकदारांनी शनिवारी गांधी उद्यानात बैठक घेतली. त्यानंतर संतप्त गुंतवणूकदारांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून पोलिस ठाण्यातच आपला ठिय्या मांडला. यानंतर फसवणूक करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी गुंतवणुकदारांनी केली. पोलिस अधिकार्‍यांनी समजूत घातल्यानंतर गुंतवणुकदारांनी आंदोलन मागे घेतले. तसेच त्यांनी आपल्या गुंतवणुक केलेल्या पैश्यांच्या हप्त्याच्या पावत्या देखील पोलिस ठाण्यात जमा केल्या.

गांधी उद्यानात झाली बैठक
मैत्रेयच्या फसवणुक झालेल्या गुंतवणूकदारांची शनिवारी सकाळी 10 वाजता गांधी उद्यानात बैठक घेण्यात आली होती. यावेळी शंभर ते दिडशे गुंतवणुकदारांची बैठकीत उपस्थिती होती. यावेळी बैठकीत सभासदांनी आप-आपल्या व्यथा मांडल्या. यानंतर संतप्त झालेल्या गुंतवणुकदारांनी मैत्रेयच्या अधिकार्‍यांवर कारवाई होवून पैसे मिळत मिळावे असे बैठकीत ठरविल्यानंतर गुंतवणुकदारांनी थेट सकाळी 12 वाजता जिल्हा पेठ पोलिस स्टेशन गाठले. यावेळी गुंतवणूकदारांसह एजंटदेखील पोलिस ठाण्यात उपस्थित होते. सर्वात जास्त गुंतवणुकदार महिला होत्या. पोलिस उपनिरीक्षक अजितसिंग देवरे व गजानन राठोड यांच्याकडे आपली व्यथा मांडली. मैत्रेयच्या अधिकारी व एजटांवर गुन्हे दाखल करून पैसे मिळवून द्यावे, अशी मागणी संतप्त गुंतवणुकदारांनी पोलिसांनाकडे केली.

पोलिसांनी घातली समजूत…
पोलिस उपनिरीक्षक अजितसिंग देवरे हे मैत्रेय फसवणूक प्रकरणाचा तपास करीत असल्याने शनिवारी गुंतवणुकदारांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात येवून त्यांच्या अडचणी सांगितल्या. सर्वांच्या समस्या जाणून घेत त्यांनी संतप्त गुंतवणुकदारांची समजूत घालून प्रकरणाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस ठाण्यात गुंतवणुकदारांनी एकच गर्दी केली होती.

ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सूचना
मैत्रेय कंपनी आणि नाशिक शहरातील सरकारवाडा पोलिस ठाण्याने एक एकत्रीत खाते उघडले आहे. तसेच सकारवाडा पोलिसांनी सर्व पॉलीसी धारकांच्या माहितीही गोळा केलेली आहे. त्यांनी दिलेला ऑनलाइन अर्ज भरल्यास गुंतवणुकदारांची मुदत पूर्ण झालेली पॉलीशीची रक्कम गुंतवणुकदाराच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अजितसिंग देवरे यांनी दिली. तसेच ज्या गुंतवणूकदारांची पॉलीसीची मुदत पूर्ण झाली असेल त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात किंवा सरकारवाडा पोलिस ठाण्यात ते सर्टिफिकेट जमा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आतापर्यंत आतापर्यंत 61 लाख 93 हजार 981 रुपयांच्या पॉलिसी पोलिस ठाण्यात जमा झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण दोन ते तीन कोटी रुपयांच्या पॉलीसी असण्याची शक्यता आहे.

पोलिस ठाण्याच्या आवारात वाद…
जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या आवारात मैत्रेयच्या गुंतवणुकदार एजंटांमध्ये वाद झाले. यावेळी गुंतवणुकदार एजंटवर आरोप करीत होते. तर एजंट ते आरोप खोडून काढत होते. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारात चांगलाच गोंधळ झाला. दरम्यान, महिला गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणात जास्त असल्याने पोलिस ठाण्यात महिलांनी गर्दी केली होती. त्यात पैशांच्या मागणीवरून एजंट आणि महिलांमध्ये तुतु-मैमै झाली.