मैत्रीणीच्या पतीने केला तरुणीवर अत्याचार

पुणे : मैत्रिणीचा पती म्हणून तिचा त्याच्याशी संपर्क होता. इन्स्टाग्रामवरून त्याने तू खूप आवडतेस, असे म्हणून तिला फिरायला नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळचे फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला, तसेच तिच्याकडून पैसे घेतले. त्याच्या मित्रानेही तिला धमकावून तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित करून, तिच्याकडे पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

चंदन नगर पोलिसात गुन्हा
या प्रकरणी खराडी येथील एका 23 वर्षांच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सिद्धार्थ मधुकर श्रीखंडे (वय 22) आणि आशिष विजय कांबळे (वय 23, दोघे रा.थिटे वस्ती, खराडी) यांना अटक केली आहे. हा प्रकार खराडीतील डब्ल्यूटीसी सेंटर, वाघोलीतील खांदवेनगरमधील कृष्णा लॉज येथे जून, 2021 ते 20 मे, 2022 दरम्यान घडला.

अखेर पोलिसात तक्रार
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हा फिर्यादीच्या मैत्रिणीचा पती आहे. त्याने फिर्यादीचे इन्स्टाग्राम अकाउंटवरून फिर्यादी यांना मेसेज करून फिर्यादी यांना मोबाइलवर फोन करून, तू मला खूप आवडतेस, असे म्हणून तिला कारने वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेले. तेथे तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादीचे नग्न फोटो व व्हिडीओ काढले. ते फोटो, व्हिडीओ व्हायरल करेल व तुझ्या घरच्यांना दाखवितो, अशी धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी 17 हजार रुपये घेतले, तसेच त्याचा मित्र आशिष कांबळे याने फिर्यादी यांना धमकी देऊन तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. तिला हाताने मारहाण करून पैशांची मागणी केली. त्यामुळे सतत होणारा अत्याचार आणि पैशांची मागणी याला कंटाळून शेवटी तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक काळे अधिक तपास करीत आहेत.