Private Advt

मेहुणबारे खुनाने हादरले : मद्यपी पत्नीचा पतीकडून खून

भुसावळ/मेहुणबारे : एकीकडे रंगपंचमीचा उत्साह सुरू असताना दुसरीकडे मद्य प्राशन केल्यानंतर झालेल्या वादानंतर पतीने पत्नीची कुर्‍हाडीचे घाव घालून निर्घूण हत्या केली. मेहुणबारे शिवारात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत निनुबाई कुंवरसिंग पावरा (27) या विवाहितेचा मृत्यू झाला तर खून प्रकरणी कुंवरसिंग चत्तरसिंग पावरा (30, रा.मोहरतमाळ, मध्यप्रदेश) या आरोपी पतीस मेहुणबारे पोलिसांनी अटक केली आहे.

मद्यपानाच्या वादातून पत्नीची हत्या
कुंवरसिंग चत्तरसिंग पावरा (रा.मोहरतमाळ, मध्यप्रदेश) हे पत्नी निनुबाई यांच्यासह सालदारकीने काम करण्यासाठी मार्च 2021 मध्ये तालुक्यातील मेहुणबारे शिवारातील एका शेतकर्‍याकडे आले होते व शेतातील झोपडीतच (शेडमध्ये) त्यांचे वास्तव्य होते. शुक्रवार, 18 रोजी रात्री दहा वाजता निनुबाई यांनी मद्य प्राशन केल्यानंतर आरोपी पती कुंवरसिंग याने याबाबत पत्नीला जाब विचारला असता उभयंतांमध्ये कडाक्याचे भांडण झाले व संतापाच्या भरात पतीने शेडमधील कुर्‍हाडीने पत्नीची निर्घृणपणे हत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर या परीसरात मोठी खळबळ उडाली.

पोलिस प्रशासनाची धाव
खुनाची माहिती मिळताच मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विष्णू आव्हाड, प्रकाश चव्हाण, धर्मराज पाटील, सुभाष पाटील, मोहन सोनवणे, गोरख चकोर, हनुमंत वाघेरे, योगेश बोडके आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व घटनेबाबत पती कुवरसिंग यांना विचारपूस केली असता. त्यांनीच पत्नीची कुर्‍हाड डोक्यात घालून खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली. ज्ञानेश्वर माळी यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात आरोपी पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.