Private Advt

मेहरुण तलावात बुडाल्याने जळगावातील 16 वर्षीय बालकाचा मृत्यू

जळगाव : मेहरूण तलावात मित्रांसोबत गेलेल्या 16 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडाल्य ाने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हर्षल संजय महाजन (16, रा. अयोध्या नगर जळगाव) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.

तलावात बुडाल्याने मृत्यू
हर्षल महाजन हा आपल्या आई-वडीलांसह अयोध्या नगरात वास्तव्यास होता. वडील संजय महाजन हे एमआयडीसीतील बेन्झो केमिकल कंपनीत नोकरीला आहे तर हर्षल हा नववीचे शिक्षण घेत होता. मंगळवार, 3 मे रोजी सकाळी नऊ वाजता संजय महाजन हे कामावर निघून गेले त्यांच्या नंतर हर्षलदेखील मित्रांसोबत बाहेर निघून गेला. दरम्यान दुचारी तो मित्रांसोबत मेहरूण तलावात पोहण्यासाठी गेला असता पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली तर बालक बुडत असतानाच किनार्‍यावर उभे असलेल्या काही तरुणांनी आरडाओरड करताच काही पट्टीच्या पोहणार्‍यांनी त्याला मयत स्थितीत बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, साईनाथ मुंढे यांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना केला.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
घरच्यांना या घटनेची माहिती मिळताच आई, वडील व मित्रांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात धाव घेवून प्रचंड आक्रोश केला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.