Private Advt

मेहरुण तलावाजवळ प्रौढाची हत्या

जळगाव : जळगावात अवघ्या पंधरा दिवसात तीन खुनांची घटना ताजी असतानाच पुन्हा एका प्रौढाचा खून झाल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली. मेहरुण तलावाच्या काठावर अतिशय क्रूर पध्दतीने ठेचून एकाचा खून करण्यात आला असून अद्याप मयताची ओळख पटलेली नाही.

दगडाने ठेचून केली हत्या
मेहरूण तलावाच्या काठावर एका प्रौढाचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी निरीक्षक अरुण धनवडे व सहकार्‍यांनी धाव घेली. मयत 50 वर्षीय अनोळखी असून अद्यापपर्यंत त्याची ओळख पटलेली नाही. या मृतदेहाचा चेहरा हा दगडाने ठेचण्यात आला असून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असावी ? असा अंदाज आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये जळगाव शहरात लागोपाठ झालेला हा चौधा खून असल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

जळगावात खुनांचे सत्र कायम
समता नगर भागातील रहिवासी सागर नरेंद्र पवार (28) या तरुणाचा विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधातून संशयीत आरोपी अमित नारायण खरे (डॉ.आंबेडकर नगर, समता नगर, जळगाव) याने शुक्रवार, 25 मार्च रोजी रात्री खून केला होता तर जळगावच्या शिवाजी नगर भागातील पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेशी असलेल्या दोघांच्या असलेल्या अनैतिक संबंधातून रीक्षा चालक असलेल्या नरेश आनंदा सोनवणे (28, रा.राजाराम नगर, दुध फेडरेशन) या तरुणाची चॉपरचे वार करून हत्या करण्यात आली होती. जळगावातील शिवाजी नगर, हुडको भागात शनिवार, 26 मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणी आकाश सखाराम सोनवणे (24, कानळदा रोड, जळगाव) या आरोपीच्या जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. या दोन्ही खुनांच्या घटना ताज्या असतानाच सोमवार, 4 एप्रिल रोजी सायंकाळी पुन्हा शहरातील शिवाजीनगर हुडको परीसरात 40 वर्षीय मोहंमद मुसेफ शेख इसाक (40, रा.शिवाजी नगर) यांचा शेख अलिमोद्दीन शेख (28, रा.उस्मानिया पार्क) याने जुन्या वादातून खून केला होता. पंधरा दिवसात खुनाच्या तीन घटना घडल्यानंतर शनिवारी दुपारी पुन्हा मेहरूण तलावाकाठी झालेल्या खुनानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.