मला बदनाम करण्याचे षडयंत्र; अब्रू नुकसानीचा दावा करणार

0

पुणे: भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडे यांच्याविरोधात मेव्हण्याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. दोन वर्षापूर्वी जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या तक्रारीवरून मेव्हणा युवराज ढमाले यांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हा गुन्हा राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप काकडे यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देणार आहे असे  काकडे यांनी म्हटले आहे. लवकरच मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही काकडे यांनी सांगितले आहे.

भाजपाचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आपल्या मेव्हण्याला थेट गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार काल चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली. त्यानुसार पोलिसांनी संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

“मेव्हणा युवराज ढमाले याने माझ्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हे समजल्यावर वाईट वाटले आहे. गेल्या तीन वर्षात मी ढमाले याला केवळ दोनदाच भेटलो आहे, ते ही एकदा माझ्या वाढदिवसादिवशीच. मात्र, हे एक राजकीय षडयंत्र आहे. माझ्यासारख्या माजी खासदारावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी किमान पोलिसांनी मला विचारणे गरजेचे होते. मात्र, कोणत्याही प्रकारची कल्पना न देताच पोलिसानी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातून त्यांच्यावर राजकीय दाबाव असल्याचे दिसून येते.” असे काकडे यांनी सांगितले आहे.