मृदा परिक्षक नियुक्तीच्या अर्जासाठी केले आवाहन

0

जळगाव । जिल्ह्यातील शेतकर्‍यांना त्यांच्या शेतातील मातीची तपासणी करुन तत्परतेने मृदा आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन देण्यासाठी 5 वर्षाच्या करारतत्वावर मृदपरिक्षक (मिनीलॅब) नेमण्यात येणार आहेत. ही सेवा देण्यास इच्छुक संस्थांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांनी मृदा परीक्षा करण्यासाठी मिनी लॅब विकसित केलेली आहे. ही लॅब चालवून शेतकर्‍यांना मृदा परीक्षा सेवा देण्यासाठी निवडक शेतकरी उत्पादक कंपनी कृषि चिकित्सालय, अशासकीय सेवाभावी संस्था अथवा शेतकरी गटांची निवड जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांचेमार्फत करण्यात येणार आहे. ही निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी, जळगाव यांचे अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली आहे.

जिल्ह्यात 131 मिनीलॅब वितरित होणार
जिल्ह्यात एकूण 131 मिनीलॅब वितरीत करण्यात येणार आहेत. तालुकानिहाय वितरीत करावयाच्या मिनीलॅबची संख्या याप्रमाणे- जळगाव-9, भुसावळ-8, बोदवड-8, यावल-9, रावेर-9, मुक्ताईनगर-9, अमळनेर-9, चोपडा-9, एरंडोल -8, धरणगाव-9 पारोळा- 8, पाचोरा-9, भडगाव-9, चाळीसगाव-9, जामनेर -9 असे एकूण – 131. यासाठी लाभधारक/संस्थेची निवड करतांना संस्थेने कृषि क्षेत्राशी निगडीत केलेले कार्य, तज्ज्ञ मनुष्यबळ, जागेची उपलब्धता, आर्थिक स्थिती, लेखा परिक्षण अहवाल इ. बाबी विचारात घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी अथवा शेतकरी गटांनी 21 एप्रिल 2017 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावे. विहित नमुन्यातील अर्ज अटी व शर्ती तसेच अधिक माहितीसाठी संपर्काचे आवाहन केले आहे.