मृत अर्भकाला फेकले कचराकुंडीत

0

जळगाव । जिल्हा रूग्णालयात मंगळवारी मध्यरात्री एका महिलेची प्रसुति झाली मात्र बाळ हे मृत अवस्थेतच झाल्याने सकाळी 7 वाजता बालकाला त्याच्या आजीजवळ सोपविण्यात आले. मात्र, आजीने मृत बाळाला चक्क जिल्हा रूग्णालयातील मागील बाजूस असलेल्या एका कचरा कुंडीत फेकून दिले. त्यानंतर एका एका भटक्या कुत्र्याने अर्भक उचलून भरवस्तीत आणून टाकल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी गांधीनगरातील नागरिकांच्या सतर्कतेने उघडकीस झाली. यातच कचरा कुंडीत मृत अर्भकाला टाकणार्‍या बाळाच्या आजीला (महिलेच्या सासुला) जिल्हापेठ पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून मृतदेहाची विंटबना केल्याप्रकरणी मृत अर्भकाच्या आजीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

मृत बाळ सोपवले आजीला
सोयगाव तालुक्यातील पळासखेडे येथील गीताबाई तुकाराम साखळे (वय-30) ही महिला मंगळवार 4 रोजी संध्याकाळी जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. मात्र, मंगळवारी मध्यरात्री 1.50 वाजेच्या सुमारास गिताबाई यांची प्रसुति झाली. यात त्यांनी एका मुलीला जन्म दिला. मात्र, बाळ हे मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, गीताबाई सोबत तिची सासू यशोदाबाई किसन साखळे या देखील जिल्हा रुग्णालयात आल्या होत्या.

जिल्हा रूग्णालयातील पारिचारिकांनी मृत मुलीचे अर्भक बुधवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास यशोदाबाई यांच्या ताब्यात दिले. सोबत कुणी पुरुष नसल्याने अर्भकाची विल्हेवाट कुठे व कशी लावावी या विचारात अशिक्षित यशोदाबाई यांनी अर्भक 8 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालया मागील भागातील एका बोळीतील कचराकुंडीत टाकले. आणि तेथून पळ काढला.

पोलिसांची घटनास्थळी धाव
सकाळी कचरा कुंडीत अन्नाच्या शोधात परिसरातील भटक्या कुत्र्याला अर्भक सापडले. त्याने ते कचराकुंडीतून तोंडात उचलून आर.आर. विद्यालय परिसरात गांधीनगरात डॉ़ गणेश रोटे यांच्या रुग्णालयाजवळ असलेल्या गल्लीत आणून टाकले. ते खाण्याच्या तयारीत असता हा प्रकार रहिवाश्यांच्या दृष्टीस पडला. त्यांनी लागलीच त्या ठिकाणाहून कुत्र्यांना हकलून लावत तात्काळ याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक गजानन राठोड यांना माहिती कळविली. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन राठोड हे गुन्हे शोध विभागातील राजेश मेंढे, रवी नरवाडे, नाना तायडे, सुधीर चौधरी, छगन तायडे, शेखर चौधरी, शेखर जोशी, अकबर तडवी, संतोष पवार या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी प्रकार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. पोलिसांनी अर्भकाला कापडात गुंडाळून एका खोक्यात अर्भकाला टाकून अर्भक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी त्याची तपासणी केली व मृत घोषित केले.

यशोदाबाईंनी सांगितली खरी हकीकत
पोलिसांनी बाळाला जिल्हा रुग्णालयात आणले व त्याची डॉक्टरामार्फत तपासणी केली व ओळख पटविली. काही वेळातच बाळ हे प्रसूतीवार्डात दाखल असलेल्या गीताबाई साखळे यांचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मृत अर्भकाला बाळाच्या आजी यशोदाबाई यांच्या ताब्यात दिले असल्याचे पारिचारिकांनी सांगितले. मात्र, सकाळी मुलगा बाळाला घेवून गेल्याचे यशोदाबाई यांनी सांगितले. परंतू काही मिनिटातच यशोदाबाई यांनी खरी हकीकत सांगत मीच मृत अर्भक कचरा कुंडीत फेकल्याचे त्यांनी पोलिसांकडे कबूली दिली. त्यानुसार पोलिसांनी यशोदाबाई यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती़ यातच पोलिसांकडून प्रसुति करणार्‍या डॉक्टराची चौकशी देखील करण्यात येणार आहे. दरम्यान, यापूर्वीही तीन मुलींचे व दोन मुलांचे प्रसुतिनंतर मृत्यू झाल्याने गिता यांच्या सासुबाई यशोदाबाई कंटाळल्या होत्या. त्यामुळे मंगळवारी प्रसुतिनंतर मृत मुलगी झाल्याने त्यांनी कंटाळून अर्भकाला खड्डयात न पुरवता चक्क जिल्हा रूग्णालयाच्या मागील परिसरातील कचराकुंडीत टाकले. दरम्यान, नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ताब्यात घेतले व शवविच्छेदन विभागात अर्भक ठेवले.

यापूर्वीही चार बाळांचा मृत्यू
मृत बाळाचे वडील तुकाराम साखळे हे आई यशोदाबाई, वडील किसन, पत्नी गीताबाई व मोठा भाऊ या परिवारासह पळासखेडे येथे वास्तव्यास आहे. रोजंदारी काम करून तसेच नफ्याने दुसर्‍याची शेती करून कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. गीताबाई यांना यापूर्वीही चार वेळा बाळाला जन्माला दिला. यात दोन मुले जन्मानंतर काही दिवसांनी वारले. तर दोन मुली जन्मत:च मृत निघाल्या. या बाळांना पळासखेडे येथील घराच्या मागेच पुरले असल्याचे यशोदाबाई यांनी सांगितले. पाचव्यांदा गीताबाई ह्या प्रसूती झाल्या होत्या़ मात्र नियतीने डाव साधला व यंदाही त्यांना झालेली मुलगी झाली मात्र ती मयत निघाली. त्यामुळे कंटाळून यशोबाई यांनी मृत अर्भक कचराकुंडीत टाकल्याचे समोर आले.