मुस्लिम समाजामध्ये ३८ टक्के बालमजूर; ५ टक्के आरक्षण दिलेच पाहिजे

0

आरक्षणाच्या मागणीसाठी दलवाई यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई: मुस्लिम समाजामध्ये ३८ टक्के बालमजूर आहेत. यावरून मुस्लिम समाजाची स्थिती काय आहे हे लक्षात येते. त्यामुळे राज्य सरकारने मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण दिलेच पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे.

खासदार दलवाई यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने आज गुरूवारी दि. २२ रोजी दुपारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली. त्यानंतर विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना दलवाई यांनी याबाबत माहिती दिली.

खासदार हुसेन दलवाई म्हणाले, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत आहे, आमचा त्याला पाठिंबा आहे. मात्र, सरकारने मुस्लिमांनाही ५ टक्के आरक्षण दिले पाहिजे. मुस्लिम समाज आजही हलाखीचे जीवन जगत आहे. गोपालसिंग कमिटी, सच्चर कमिटी यांच्यासह चार कमिट्यांनी मुस्लिम समाजाबाबतची परिस्थिती काय आहे हे समोर ठेवले आहे. या कमिट्यांनी दलित व ओबीसी समाजापेक्षाही मुस्लिम समाज मागासलेला असल्याचे वास्तव समोर आणले आहे. मुस्लिम समाजातील ३८ टक्के मुले बालमजूर काम करतात अशी आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे देशातील इतर सर्व समाजाच्या बरोबरीने मुस्लिम समाजाला आणण्यासाठी आरक्षण दिले पाहिजे, अशी आमची मागणी आहे असे दलवाई यांनी स्पष्ट केले.

राज्यपाल राव यांच्या भेटीबाबत बोलताना दलवाई म्हणाले की, काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण दिले होते. मुंबई हायकोर्टानेही त्याला मान्यता दिली होती. आघाडी सरकारने याबाबत अध्यादेश काढला होता. मात्र, त्यानंतर सत्ताबदल झाला. पुढे सरकारने कायदा न केल्याने अध्यादेशची मुदत संपल्यानंतर तो रद्द झाला. यामुळे मुस्लिम समाज आरक्षणाला मुकला याबाबतची माहिती जेव्हा आम्ही राज्यपालांना दिली तेव्हा त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. मी याबाबत सरकारला सूचना करेन पण जे काही करायचे ते सरकारनेच करायचे आहे, असे सांगून आपल्याला काही घटनात्मक मर्यादा आहेत असे सांगितल्याचे दलवाई यांनीमाध्यमाच्या प्रतिनिधींना सांगितले.