मुळशी धरणाचे पाणी मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही

0

आमदार राहुल कुल यांचे आश्‍वासन; दौंड तालुक्यातील कासुर्डीत 4 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

दौंड : मुळशी धरणाचे पाणी पुणे जिल्ह्यासह इतर भागातील शेतीला मिळावे, यासाठी राज्य शासनाने एक समिती स्थापन केली आहे. शासनाने या समितीत काम करण्याची संधी दिली आहे. या माध्यमातून मुळशी धरणाचे पाणी मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही, अशी माहिती दौंडमधील राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांनी दिली. कुल यांच्या हस्ते दौंड तालुक्यातील कासुर्डी आणि परिसरात 4 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.

बेबी कालव्यासाठी 20 कोटी

मागील काही वर्षांपासून बंद असलेल्या जुना बेबी कालव्याच्या दुरुस्तीसाठी देवेंद्र फडणवीस सरकारने 20 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे हवेली, दौंड येथील शेतीला या कालव्याच्या पाण्याचा फायदा होत आहे. मुळा-मुठा नदीचे दूषित पाणी शुद्धीकरण करून ते या बेबी कालव्यात टाकून शेतीसाठी वापरात आणले जात आहे. या काळ्या पाण्याबाबत विरोधकांकडून टीका केली जाते, परंतु येत्या दोन-तीन वर्षांत पुणे महापालिकेच्या माध्यमातून हे काळे पाणी शुद्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच या बेबी कालव्याचे अस्तरीकरण करण्यासाठी आग्रही असल्याचे कुल यांनी सांगितले.

कुल गटात 35 ते 40 कार्यकर्त्यांचा प्रवेश

यावेळी भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश शेळके, माऊली ताकवणे, बाळासाहेब लाटकर, शब्बीरभाई सय्यद, झुंबर म्हस्के, उत्तम सोनवणे दत्तात्रय महाराज सोळसकर, उमेश म्हेत्रे, विलास जगदाळे, कैलास खेडेकर, वाल्मिक आखाडे, संतोष आखाडे, गोपीनाथ भोंडवे उपस्थित होते. यावेळी आमदार राहुल कुल गटात 35 ते 40 कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यामध्ये भैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष महेंद्र आखाडे, सेवा सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र मधुकर आखाडे, माजी सरपंच पांडुरंग आखाडे, उद्धव आखाडे, माजी अध्यक्ष उत्तम सोनवणे, सोपान गायकवाड, महेश गायकवाड, माजी उपसरपंच संतोष भिसे, गोविंद गायकवाड यांसह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

दुरुस्तीसाठी 800 कोटी उपलब्ध

कुल म्हणाले की, राज्यातील जलसंपदा विभागाच्या सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्ती व देखभालीसाठी दोन टक्केच निधी राखून ठेवला जात होता. आता दहा टक्के निधी वाढवल्याने तो दुरुस्तीसाठी 800 कोटी रुपये उपलब्ध झाल्याने अनेक वर्षांपासून रखडलेली दुरुस्तीची कामे होतील. खडकवासला कालवा दुरुस्तीसाठी विधानसभेत अनेकवेळा मागणी केली असून कालवा दुरुस्तीसाठी आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले.

Copy