मुलीला शोधतांना गच्चीवरून पडून वडीलांचा मृत्यू

0

जळगाव ।रंगपंचमीनिमित्त रंगाची उधळण करीत असताना खाली लपलेल्या मुलीला उंचावरुन शोधताना तोल जावून गच्चीवरुन पडल्याने शाम परमानंद आहुजा (वय 42) यांचा मृत्यू झाल्याची ह्दयद्रावक घटना सोमवारी दुपारी दोन वाजता सिंधी कॉलनी घडली. दरम्यान,आहुजा यांची मुलगी निकिता ही दहावीला असल्याने तिने सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजता वडिलांचा चेहरा पाहून परीक्षा केंद्र गाठले, नंतर आहुजा यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.

सिंधी कॉलनी येथील रहिवासी श्याम परमानंद अहुजा हे सिंधी कॉलनी परिसरातील मित्रमंडळ कुटुंबासह धुळवडीचा आनंद घेत होते. यातच दुपारी दोनच्या सुमारास रंग खेळत असताना चक्कर येऊन गच्चीवरून खाली कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. श्याम यांच्या उजव्या हाताच्या दोन बोटांवर विद्युत झटका लागल्याचे व्रण होते. त्यामुळे गच्चीवर रंग खेळत असताना शॉक लागून ते खाली पडल्याचा अंदाज आहे. खाली पडल्यावर माजी नगरसेवक अशोक मंधान, टिकमदास तेजवाणी आदींनी तत्काळ त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्याम अहुजा यांचे गणेश मार्केट येथे होलसेल होजिअरीचे दुकान असून, दोन मुले एक मुलगी पत्नी असा परिवार आहे. कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.